निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोग, भाजपा तसेच शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे. सोबतच चोराची चोरी पचलेली असली तर चोर हा चोरच असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी शिवसैनिकांना पुन्हा जोमाने पक्षाचे काम करा, असे आवाहन केले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांत टीका केली आहे. तसेच मी २००५ साली घेतलेला निर्णय योग्य होता, असेही नारायण राणे म्हणाले आहेत. ते आज (१८ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> “फोटोची कॉपी करण्यापेक्षा..,” चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंची बोचरी टीका; बाळासाहेबांचे नाव घेत म्हणाले, “आज…”

आता शिवसेना ही शिवसेना राहिलेली नाही

“मी २००५ साली शिवसैनिक म्हणून शिवसेनेचा त्याग केला. मला आता असे वाटत आहे की, मी त्यावेळी घेतलेला निर्णय योग्य होता. आता शिवसेना ही शिवसेना राहिलेली नाही. शिवसेना पक्ष आता मातोश्रीची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. तेथे ना मराठी माणसाला न्याय मिळाला ना हिंदुत्वाला न्याय मिळाला,”

हेही वाचा >>> धनुष्यबाणानंतर मशाल चिन्हही जाणार? उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना उद्देशून मोठं विधान; म्हणाले, “कदाचित…”

आम्ही उद्धव ठाकरेंच्या स्वभावामुळेच निघालो

“उद्धव ठाकरे आपली माणसं सांभाळू शकले नाहीत. आम्ही उद्धव ठाकरेंच्या स्वभावामुळेच निघालो. त्यांना त्यांचा मुलगा आणि पत्नीच्या पलीकडे शिवसैनिक नाही,” अशी टीकादेखील नारायण राणे यांनी केली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटातील हा वाद अद्याप संपलेला नसल्याचे म्हटले जात आहे.