शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नुकतीच एक मुलाखत घेतली आहे. संबंधित मुलाखतीचा पहिला भाग २६ जुलै रोजी आणि दुसरा भाग आज २७ जुलै रोजी प्रसारित करण्यात आला आहे. या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत बोचरी टीका केली आहे. त्यांनी एकेरी उल्लेख करण्यासोबतच उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
नारायण राणे यांनी केलेल्या टीकेचं तुम्ही समर्थन करता का? असा प्रश्न विचारला असता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. ते म्हणाले, “हे बघा, त्यांचं समर्थन करता का? हे तुम्ही त्यांच्या पक्षाच्या लोकांना विचारायला हवं. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे का? माझ्यावर नाही. ज्यावेळी मी त्यांच्या (नारायण राणे) मुलाने केलेल्या टीकेला विरोध केला होता. तेव्हा त्यांच्या मुलानं (निलेश राणे) माझ्याबद्दल काय लिहिलं होतं? तर “तुम्हाला जर उद्धव ठाकरे यांच्याबाबत एवढी आपुलकी असेल तर तुम्ही त्यांच्या घरी ‘मातोश्री’वर जाऊन भांडी घासा. त्यावर कुणी शिवसैनिक बोलला नाही. त्याच्यानंतर मीही बोलायचं सोडून दिलंय.”
हेही वाचा- “उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे WWF चा सामना, मारामारी होते पण…” मनसे नेत्याची खोचक टीका
“उद्धव ठाकरेंच्या मोठेपणात शिवसैनिकांना काहीच रस नसेल तर, मी त्यांच्यासाठी भांडण कशासाठी करू? मी माझ्या अंगावर शत्रू का ओढून घेऊ? माझा उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेला आदर कायम आहे. पण मी निलेश राणेंचा विरोध केल्यानंतर, समोरून जी प्रतिक्रिया आली, त्यावर शिवसैनिक काहीच बोलले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा विषय संपला आहे. याच्यानंतर मी हा विषय काढणार नाही, त्यामुळे तुम्हीही हा प्रश्न विचारू नये, कारण हा विषय माझ्यासाठी संपला” अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.
खरंतर, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्यं करू नयेत, अशी भूमिका घेतली होती. याबाबतची तक्रार त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती. त्यानंतर भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलणं टाळलं होतं. पण राणे परिवारांकडून सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात होती. त्यामुळे नवीन सरकारमध्ये राणे-केसरकर असा वाद निर्माण झाला होता.