शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपा तसेच बंडखोर शिंदे गटाला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नावे घेत त्यांच्यावर टीका केली. प्रकृती ठिक नसतानाही उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर रोखठोक भाषण केले. या भाषणात त्यांनी आपल्या आजारपणाचाही उल्लेख केला. दरम्यान, केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नारायण राणे यांनी याच आजारपणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. तुम्ही २० मिनिटे चालू शकत नाहीत. मग राज्यातील काम कसे करणार? असा खोचक सवाल नारायण राणे यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणात पोकळ वल्गना आणि शिव्या-शापालीकडे काहीही नव्हते. त्यांनी आमच्या नेत्यांवर टीका केली. त्यांनी आपले तोंड बंद केले नाही आणि राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला तर त्याला उद्धव ठाकरे हेच जबाबदार असतील. आम्ही आमच्या नेत्यांबद्दल काहीही ऐकून घेणार नाही. त्यांनी अमित शाहांवर टीका केली. थोडी मर्यादा राखली गेली पाहिजे. स्वत: चालू शकत नाहीत. मंत्रालयात येऊ शकत नाहीत. मात्र दुसरे या राज्यातून त्या राज्यात फिरत आहेत, अशी टीका ते करत आहेत. हा माणूस २० मिनिटे चालू शकत नाही. फक्त बढाया मारत आहेत. डॉक्टरांनी वाकायला परवानगी दिलेली नाही, असे ते म्हणत होते. वाकायलाही डॉक्टर लागत असेल तर तू काम काय करणार? अशी टीका नारायण राणे यांनी केली.
हेही वाचा >>> बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात नेमका फरक काय? नारायण राणे स्पष्टच बोलले; म्हणाले…
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जी टीका केली, ती केलेल्या उपकाराची परतफेड आहे का? २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव तसेच फोटो लावून शिवसेनेने विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेतील नेते मोदींच्या नावावर निवडून आले. असे असताना ते मोदींवर टीका करत आहेत, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
हेही वाचा >>> “माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला…” ; उद्धव ठाकरेंवर चित्रा वाघ यांची टीका!
उद्धव ठाकरे यांना दुसरे काही येते का? मोठ्या लोकांचे नाव घेऊन आपण टीका केली की, आपल्याला कोणीतरी मोठं म्हणेल असे त्यांना वाटते. म्हणूनच ते जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत असतात. उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री झाले. ते अडीच वर्षांमध्ये फक्त अडीच तास मंत्रालयात आले. त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेले एकतरी काम सांगावे, असे आव्हान नारायण राणे यांनी दिले.