उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी दुपारी कणकवलीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. सरपंच होण्याची लायकी नसलेल्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत, अशा शेलक्या शब्दांत राणेंनी उद्धव यांच्यावर टीका केली. उद्धव यांचे राजकारणातील कर्तृत्व आणि अस्तित्व काय असा सवालसुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच यावेळी राणेंनी कोकणातील आमदार दिपक केसरकर यांचासुद्धा चांगलाच समाचार घेतला. केसरकर यांना सावंतवाडी वगळता कोणी ओळखत नसल्याचे राणेंनी म्हटले. गोव्यात राहणारे केसरकर कोकण दहशतमुक्त कसा करणार असा प्रश्न राणे यांनी मेळाव्यात उपस्थित केला. मंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तत्पूर्वी नारायण राणेंच्या मेळाव्याची वेंगुर्ल्यात लावलेली पोस्टर्स काही अज्ञात व्यक्तींनी फाडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोस्टर्स फाडणार्‍यांना पोलीस संरक्षण देत असल्याचा आरोप राणेंच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Story img Loader