मागील अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी तसेच उद्धव ठाकरे गट यांच्यातील युतीची चर्चा सुरू होती. आमच्यात युती झालेली आहे. फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे, असे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सातत्याने सांगत होते. दरम्यान, आज (२३ जानेवारी) प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली. राज्यातील या नव्या शिवशक्ती-भीमशक्तीच्या प्रयोगानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गट तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. राज्यात आता शिवसेना कोठे राहिली आहे. प्रकाश आंबेडकर आणि भीमशक्तीचा काय संबंध? असे नारायण राणे म्हणाले आहेत. ते माध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
प्रकाश आंबेडकरांनी किती दलितांचे संसार बसवले
“दोन गट पडल्यानंतर आता शिवसेना आहेच कुठे. उगीचच शिवशक्ती-भीमशक्ती अशी मोठीमोठी वाक्ये कशाला वापरायची. या राज्यात आणि देशात भीमशक्ती आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्याकडे भीमशक्ती किती आहे? प्रकाश आंबेडकर आणि भीमशक्तीचा काय संबंध,” अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसेच प्रकाश आंबेडकरांनी किती दलितांचे संसार बसवले हे सांगावे. किंवा मी किती दलितांचे संसार बसवले, याबाबत मी माहिती देतो,” असेही नारायण राणे म्हणाले.
हेही वाचा>>> ठाकरे गट-वंचितच्या युतीची घोषणा, पण ‘फॉर्म्यूला’ काय? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पुढची राजकीय वाटचाल…”
लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र- उद्धव ठाकरे</strong>
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषण केली. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. “जनतेला नको त्या वादात अडकवून भ्रमात ठेऊनच हुकुमशाही येते. त्याच वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्यावेळी विचार करून पुढे जाऊ. मात्र, एक गोष्ट नक्की आहे की, महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेपर्यंत देशात जे चाललं आहे, ते पोहचवण्याची गरज आहे,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.