केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे, त्यांचे नेते शरद पवार की उद्धव ठाकरे? असे प्रश्न उपस्थित करत, “…हे लावालावी करायचं काम त्याचं नाव संजय राऊत” असं नारायण राणेंनी म्हटलं. सिंधुदुर्ग येथे पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. शिवसेना खासदार संजय राऊतही यांनी आज एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील भाषणादरम्यान बोलताना भाजपावर टीका केली होती.
यावर प्रत्युत्तर देताना केंद्रीयमंत्री नारायण राणे म्हणाले, “भाजपाने देशातील ऐक्य बिघडवण्याचं काम काही केलेलं नाही. पण काही लोकांचे गुपचूप हे व्यवसाय सुरू असतात, हे राजकारण चालू असतं. मला कळत नाही संजय राऊत कोणत्या पक्षात आहेत, राष्ट्रवादीत आहेत, त्यांचे नेत शरद पवार आहेत की शिवसेनेत आहेत, उद्धव ठाकरे त्यांचे नेते आहेत, काही कळत नाही. ते दिल्लीत पवारांच्याच कार्यालयात असतात. त्यामुळे पक्षाशी प्रामाणिक नाही, निष्ठा नाही. आव आणायचं काम ते करत आहेत आणि ते दाखवताय तसे नाहीत. जे काय बोलतात ते कुठल्याही वृत्तपत्राचा संपादक अशा भाषेत नाही बोलू शकत. जी भाषा मार्गदर्शक नाही, लोकांचं प्रबोधन करणारी नाही, विकासात्मक नाही. या विषयावर ते बोलतच नाही. कधी होते शिवसेनेत, काय केलं? …हे लावालावी करायचं काम त्याचं नाव संजय राऊत.”
तर, “भाजपाला देशाचे ऐक्य नको आहे शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की भाजपा देशाचे तुकडे करत आहे. भाजपा देशाला उलट्या दिशेने नेत आहे आणि आम्हाला आता ते कळायला लागले आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत पार पडला. अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाचं लेखन केलं आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातील भाषणात बोलातना शिवसेना खासदार संजय राऊतही भाजपावर टीका केली आहे.
याशिवाय, पत्रकारपरिषदेत बोलाताना राणे यांनी, “दोन आठवडे झाले केंद्र सरकारचं अधिवेशन सुरू झाल्यापासून आणि अधिवेशन अतिशय सुरूळीत चालेलं आहे. जे कायदे करणारी बिलं आहेत, ती देखील सुरळीत पास होत आहे. शेतकऱ्यांसंबधीचा कायदा रद्द झाला आंदोलन मागे घेण्यात आलं. सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. दुर्दैवं एकाच गोष्टीचं की आमच्या काही लष्कारी अधिकाऱ्यांच्या हॅलिकॉप्टरला अपघात झाला, ही एक दुर्दैवी घटना घडली. बाकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रामधील सरकार देशामसमोर अडचणी तर सर्व सोडवतच आहेत. करोनावर अनेक उपाय अनेक औषधं आणली गेली आणि त्यामुळे करोना आज नियंत्रणात आला आहे. केंद्र सरकारचा कारभार अतिशय चांगल्यारितीने देशहिताच्या दृष्टीने, भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने चाललेला आहे.” असंही बोलून दाखवलं.