सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचे आमदार, जिल्ह्य़ातील पदाधिकारी यांच्याबद्दल माझ्या मनात कधीही कटुता अगर भेदभाव नाही. पालकमंत्री नात्याने आघाडीचा धर्म मी प्रामाणिकपणे पाळला असल्याचे काँग्रेस नेते उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगून राष्ट्रवादीला गोंजारण्याचा आज प्रयत्न केला. त्यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांना फटकारले तर अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनाही इशारा दिला आहे.
कणकवली येथे काँग्रेस नेते नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी स्वाभिमान संघटना अध्यक्ष नितेश राणे, जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष राजन तेली, कोकण सिंचन महामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांच्या राष्ट्रवादीच्या संयोजनाबद्दल, पाठिंब्याबद्दल सक्रिय होण्यासंबंधी वृत्ते येत आहेत, पण राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यात तोडगा निघेल असे राणे म्हणाले. या दौऱ्यात नंतर कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे आमदार, प्रमुख पदाधिकारी यांना मला सांगावेसे वाटते-जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी, तुम्हा सर्वाबद्दल माझ्या मनात कधीही कटुता नव्हती, भेदभाव केला नाही. पालकमंत्री या नात्याने आघाडीचा धर्म मी प्रामाणिकपणे पाळला आहे असे नारायण राणे म्हणाले. कोणाच्याही मनात शंका असल्यास आता किंवा निवडणुकीनंतर गैरसमज किंवा कटुता असल्यास दूर करण्याची माझी तयारी आहे असे नारायण राणे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत राज्यात असणाऱ्या आघाडीला यश मिळावे, विरोधकांपेक्षा जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, असा आघाडीने चंग बांधला आहे. त्यामध्ये आपण सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीला राणे यांनी केले. आज सिंधुदुर्गात पक्षाच्या धोरणाप्रमाणे राष्ट्रवादीचे काम सुरू आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांच्या टीकेवर निवडणुकीनंतर बोलणार असल्याचे सांगताना हा माणूस ना ‘पक्षावर निष्ठा व ना जनतेबद्दल आस्था’ असा आहे. परोपकारापेक्षा स्वार्थी माणूस आहे, अशी टीका करून आमदार सावंत यांच्यावर बोलण्याचे राणे यांनी टाळले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार नीलम गोऱ्हे यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्या डोळ्यावर झापड आली असल्याने कोकणचा विकास दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. कोकणच्या विकासात सी वर्ल्ड, आयटी पार्क, रेडी बंदर, कासार्डे गार्मेट उद्योग, आडाळी एमआयडीसी, विमानतळ असे टप्पे आहेत असे राणे म्हणाले.
आमदार नीलम गोऱ्हे टीका करण्यासाठी शिवसेनेत आहे. त्या शिवसेना सोडून जात असताना साहेबांकडे नेऊन थांबविले असल्याचे राणे म्हणाले. शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्याविरोधात नीलेश याने भूमिका पाळली आहे.
अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने अभिनेता म्हणूनच राहावे. त्याने नारायण राणेंवर टीका केल्यास या कोल्ह्याच्या मागे आमचे भरपूर वाघ लागतील, हे ध्यानात घ्यावे, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा