रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे नारायण राणे विजयी झाले आहेत. नारायण राणे यांना ४,४८,५१४ मते मिळाली असून, प्रतिस्पर्धी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत यांना ४,००,६५६ मते मिळाली आहेत. नारायण राणेंनी जवळपास ४७००० हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विनायक राऊतांवर विजय मिळवला आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विनायक राऊत विजयी झाले होते, त्यामुळे ते येथून पुन्हा हॅट्ट्रिक करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती, तर त्यांना रोखण्यासाठी भाजपाने नारायण राणेंना मैदानात उतरवले होते. २००९ मध्ये नारायण राणेंचा मोठा मुलगा निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाला होता. त्यावेळी त्यांनी भाजपा आणि शिवसेनेचे संयुक्त उमेदवार सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ७ मे रोजी झालेल्या मतदानात ६१.५२ टक्के मतदान झाले होते. या लोकसभा जागेवरून एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते, परंतु मुख्य लढत भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये होती.

रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला

रत्नागिरी सिंधुदुर्ग हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवलेले नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचा १.७८ लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता. येथे काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना ६३ हजार मते मिळाली होती. २०१४ च्या निवडणुकीत निलेश राणे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती, तेव्हा राऊत यांनी त्यांचा १,५०,०५१ मतांनी पराभव केला होता. आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवडणूक लढवून जिंकवून दाखवली आहे.

हेही वाचाः मोठी बातमी! दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई ५३,३४८ मतांनी विजयी

लोकसभेची जागा २००८ मध्ये निर्माण झाली

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ २००८ मध्ये परिसीमनानंतर अस्तित्वात आला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ त्याचा भाग आहेत. २०१९ मध्ये चिपळूणची जागा वगळता उर्वरित पाच जागांपैकी शिवसेनेने चार तर भाजपाने एक जागा जिंकली होती. राज्यातील राजकारणात बदल झाल्यानंतर दोन जागा शिवसेनेकडे तर दोन जागा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत. एक जागा भाजपाकडे आणि एक जागा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे आहे. असे असूनही या भागात ठाकरे कुटुंबाचा मोठा दबदबा आहे. आता शिवसेना तुटल्यानंतरही विनायक राऊत यांना याचा फटका बसला असून, नारायण राणेंनी विजयी होत आपली ताकद दाखवून दिली आहे.