सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या सिद्धिविनायक पॅनलनं मोठा विजय मिळवत ११ संचालक निवडून आणले. महाविकास आघाडीच्या पॅनलला मात्र फक्त ८ संचालक निवडून आणण्यात यश आलं. त्यामुळे भाजपानं हा मोठा विजय मिळवल्यानंतर त्यावर खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक प्रतिक्रिया देत राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. यासोबतच, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावर देखली शेलक्या शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे.
अर्थखात्याचे मंत्री येतात आणि…
जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतानाच विरोधकांवर निशाणा साधला. “विरोधक कायद्याचा, पोलीस यंत्रणेचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. निलेश राणेंच्या जामीन अर्जावर चार चार दिवस चर्चा सुरू होती. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी असं काही पाहिलं नाही”, असं नारायण राणे म्हणाले.
यावेळी अजित पवारांवर निशाणा साधत “अर्थखात्याचे मंत्री येतात आणि तिन्ही पक्षांचा पराभव करून परत जातात. त्याला अक्कल म्हणतात”, असं नारायण राणे म्हणाले.
“ज्यांना अक्कल आहे, त्यांच्या ताब्यात..”
नारायण राणे यांनी यावेळी “विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे”, असं म्हणत खोचक शब्दात टोला देखील लगावला आहे.
सिंधुदुर्गातील विजयानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आता लक्ष्य…”!
जिल्हा बँक निवडणुकीत अकलेवरून टोलेबाजी!
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंवर अप्रत्यक्ष शब्दांत निशाणा साधला होता. “सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. काही महाभागांनी कर्ज कसं मिळवलं, कसं थकवलं हे पाहा. कुणाच्याही दबावाला, दहशतीला बळी पडू नका. विचारपूर्वक मतदान करा,” असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर नारायण राणेंनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. राणेंच्या आजच्या पत्रकार परिषदेमधल्या ‘अकले’बाबतच्या उल्लेखाला ही पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार यांनी बालेकिल्ल्यात ‘अक्कल’ काढली, नारायण राणेंकडून घणाघाती प्रत्युत्तर, म्हणाले…
“बारामतीतल्या कारखान्यांसाठी कर्ज नाही”
दरम्यान, बारामतीवरून देखील राणेंनी टोला लगावला. “बँक व्यवस्थितपणे चालवली जाईल, शेतीसाठी कर्ज दिलं जाईल, बारामतीतले साखर कारखाने खरेदी करण्यासाठी कर्ज दिलं जाणार नाही”, असं राणे म्हणाले.