माजी खासदार नीलेश राणे यांनी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संदीप सावंत यांना मारहाण केल्याचे प्रकरण ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी लक्ष घातल्यामुळे पेल्यातील वादळ ठरण्याची चिन्हे आहेत.
गेल्या रविवारी रात्री घडलेल्या या प्रकाराबाबत काल दिवसभर राजकीय वर्तुळासह प्रसारमाध्यमांमध्ये खमंग चर्चा रंगली होती. याप्रकरणी ठाण्याच्या पोलिसांनी अपहरणासारखा अजामीनपात्र गंभीर गुन्हा नोंदवल्याने नीलेश यांची अटक अटळ मानली जात होती. पण कनिष्ठ चिरंजीव नीतेश यांना गेल्या महिन्यात सिंधुदुर्गातील डंपर आंदोलनप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली होती, हे लक्षात घेऊन आज नीलेश यांच्या वतीने तातडीने कायदेशीर हालचाली करून येथील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्यात आला. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, आज स्वत: राणे यांनी सावंतांची रुग्णालयात भेट घेतली. ही भेट केवळ प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नव्हती, हे उघड आहे.
या संदर्भात लक्षात घेण्यासारखा आणखी एक मुद्दा म्हणजे, एवढी मारहाण झाल्यानंतरही सावंत यांच्या पत्नीने, नारायण राणे व त्यांच्या पत्नी नीलम राणे यांच्याबद्दल आदराचे उद्गार काढत समेटाची वाट खुली ठेवली आहे. त्याचबरोबर, सावंतांना नीलेश यांच्यासह राणे कुटुंबीयांनी व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातही विविध प्रकारची मदत वेळोवेळी केली आहे. चिपळूण तालुक्यातील राजकीय वर्तुळात त्यांची प्रतिमा मिश्र स्वरूपाची आहे. या दोन्ही मुद्दय़ांची जाणीव राणे यांनी आजच्या भेटीत करून दिली असावी, अशी अटकळ बांधली जात आहे.
यापूर्वी नोव्हेंबर २०११ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील संपर्क कार्यालयावर नीलेश राणे यांनी खासदार असताना तोडफोड केल्याचे प्रकरण गाजले होते. त्यानंतर चिपळूणमध्येच पुन्हा हा प्रकार घडला आहे. जाधव यांच्या कार्यालयावरील हल्लाप्रकरणी सावंत हेही सहआरोपी आहेत. हे सर्व कंगोरे लक्षात घेता गेले दोन दिवस गाजत असलेले हे मारहाण प्रकरण अखेर पेल्यातील वादळ ठरण्याचीच जास्त शक्यता आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा आणखी एक महत्त्वाचा पदर म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष फारसा प्रभावी नाही. राणे यांच्याबरोबर कॉंग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. त्यामुळे राणे यांचे नेतृत्व मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा संच जिल्ह्यात उरलेला नाही. त्याबाबत संघटनात्मक पातळीवर फेरजुळणी करण्याच्या प्रयत्नात राणे आहेत. त्याचबरोबर ज्या मराठा आरक्षण मेळाव्यातील सावंत यांची गैरहजेरी या प्रकाराला निमित्त ठरली तो आरक्षणाचा मुद्दा राणे यांच्या भावी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या मारहाण प्रकारणावर लवकरात लवकर पडदा पडणे ही त्यांचीही राजकीय गरज बनली आहे.
संदीप सावंत मारहाण प्रकरण पेल्यातील वादळ ठरणार?
पोलिसांनी अपहरणासारखा अजामीनपात्र गंभीर गुन्हा नोंदवल्याने नीलेश यांची अटक अटळ मानली जात होती.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-04-2016 at 01:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane meets sandeep sawant in hospital