सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे तर कणकवली मतदारसंघातून नीतेश राणे यांनी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर करूनही आज अर्ज भरलेच नाहीत. त्यांनी उद्या शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
कणकवलीतून काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनी आपणालाच पक्षाची उमेदवारी मिळणार, असे सांगत उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्ह्य़ातून तीन जागांसाठी ११ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली.
नारायण राणे यांनी कुडाळमधून तर नीतेश राणे यांनी कणकवलीतून काँग्रेस उमेदवारी दाखल करण्यासाठी आजचा दिवस निवडला होता, पण काँग्रेसने नीतेश राणे यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. या राजकीय घडामोडीत आता उद्या शनिवारी उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
कणकवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनी काँग्रेस पक्षातून दोन व अपक्ष म्हणून दोन उमेदवारी दाखल करून राणेंच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे, तसेच शिवराज्य पक्षाच्या वतीने डॉ. तुळशीदास रावराणे यांनी अर्ज दाखल केला.
कुडाळ मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक व बसपाचे रवींद्र कसालकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार विनायक राऊत यांनी हजेरी लावली होती. नारायण राणे यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून वैभव नाईक यांनी शक्तिप्रदर्शन केले होते.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात आमदार राजन तेली यांनी शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवाय काँग्रेसचे सेवादल जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी अपक्ष, बसपाच्या वतीने वासुदेव सीताराम जाधव, तर अपक्ष म्हणून अजिंक्य गावडे, गौरव लोंढे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
नारायण राणे यांचे गेली २५ वर्षांचे खंदे समर्थक राजन तेली यांनी राष्ट्रवादीत उमेदवारीच्या आश्वासनाने प्रवेश केला होता, पण राजन तेलीऐवजी शिवसेनेचे सुरेश दळवी यांना राष्ट्रवादीने स्वगृही घेऊन उमेदवारी दिली आहे. राजन तेली यांची काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी आज शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. राणे यांचे सुपुत्र नीतेश राणे यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा