Narayan Rane on Aaditya Thackeray Over Disha Salian Death Case : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा मालाड येथील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता कोर्टातही धाव घेतली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पूर्वीपासूनच या प्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं आहे. २०२१ साली घडलेल्या या घटनेची फाईल आता पुन्हा उघडली गेल्याने नारायण यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी उद्धव ठाकरेंनी फोन करून त्यांना कशी विनंती केली होती, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे गाडी चालवत होते, नार्वेकरांनी फोन केला

नारायण राणे म्हणाले, “मला आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी दोनदा फोन केला. पहिल्यांदा फोन आला तेव्हा मी मुंबईतील जुहू येथील घरी जात होतो. तेवढ्यात वांद्रे क्रॉस केल्यानंतर मला मिलिंद नार्वेकरांचा फोन आला. दादा साहेबांना बोलायचं, असं नार्वेकर म्हणाले. मी म्हटलं कोण साहेब? ते म्हणाले, उद्धवजी. ते गाडी चालवत आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हणालो ठीक आहे, द्या त्यांना.”

तुम्हालाही मुलं आहेत…

“उद्धव ठाकरेंनी फोन घेतल्यावर मी त्यांना जय महाराष्ट्र साहेब म्हणालो. तेवढ्यात ते म्हणाले तुम्ही अजूनही जय महाराष्ट्र बोलता? मी म्हणालो की मरेपर्यंत बोलणार असं माझं उत्तर लगेच. ठाकरे पुढे म्हणाले, तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत, सध्या जे प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता माझी विनंती आहे की आपण त्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये”, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती नारायण राणेंनी आज पत्रकार परिषदेत दिली.

संध्याकाळी ते कुठे धुमाकुळ घालतात ते पाहा

ते पुढे म्हणाले, “मी म्हणालो उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतर मी अमुक ठिकाणी, अमुक याच्यात कोण आहे, याचा उल्लेख केला नाही. निरपराध एका मुलीची हत्या झालीय, त्यामुळे हल्लेखोरांना अटक झाली आहे, त्यात तडजोड नाही. फक्त तुम्ही तुमच्या मुलाचं नाव घेतलं, संध्याकाळी तो जिथे जातो तिथे जाणं बरं नाही हे त्याला सांगा. माझ्या घराजवळ दिनो मोरिया राहतो. त्याच्या घरात संध्याकाळी साडे-तीन चार तास काय धुमाकूळ घालतात हे मला माहितेय, पण मी सांगणार नाही. त्यावर ते म्हणाले मी सांगतो त्याला, पण तुम्ही सहकार्य करा. मी म्हणालो ठीक आहे”, असा संवाद झाल्याचं राणेंनी स्पष्ट केलं.

कोविड काळात दुसऱ्यांदा फोन

नारायण राणेंनी दुसऱ्या फोनविषयीही माहिती दिली. ते म्हणाले, “कोविड काळात दुसऱ्यांदा फोन आला. माझ्या रुग्णालयासाठी परवानगी घेण्याकरता मी त्यांना फोन केला होता. रुग्णालयाला परवानगी मिळेलच असं ते म्हणाले. पण तुम्ही प्रेस घेता, तो उल्लेख टाळला तर बरं होईल, अशी ठाकरेंनी पुन्हा विनंती केली. त्यावर मी म्हणालो की तुम्ही म्हणता त्याचं नाव मी घेतलं नाही. मी फक्त बोललोय की त्या घटनेवेळी एक मंत्री होता”, असं राणे म्हणाले.