Narayan Rane On Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक नुकतंच लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालं आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळालं. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम आहे, त्यांचा पक्ष पुढच्या निवडणुकीत राहत नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.
नारायण राणे काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी भाजपाचे नेते तथा खासदार नारायण राणे यांना विचारला. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, “तुम्ही चांगल्या दिवशी नको त्या माणसाचं नाव घेता. विकास, समृद्धी, लोकहित हे उद्धव ठाकरेंचं काम नाही. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरे यांच काम आहे”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
नारायण राणे पुढे म्हणाले की, “त्यामुळे त्यांचा (उद्धव ठाकरे) पक्ष आवळत चालला आहे. पुढच्या निवडणुकीपर्यंत हा पक्ष राहत नाही. मी ३९ वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पक्ष होता. पण बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेना संपली”, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.