अकोला : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जूनमधील वादळात महाविकास आघाडी सरकार कोसळून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतील, असे भाकीत १९ एप्रिल रोजी वाशीम दौऱ्यात केले होते. शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे नारायण राणेंनी दोन महिन्यांपूर्वी केलेले ते भाकीत आता चर्चेत आले आहे. राणेंचे भाकीत खरे ठरणार का, यावरून आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. 

केंद्रीय मंत्री राणे १९ एप्रिल रोजी वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य शासनाच्या कारभारावर टीकास्त्र सोडत, हे सरकार पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या पराभवाचा धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. त्यानंतर लगेच शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. यानिमित्ताने नारायण राणेंच्या त्या दाव्याची चांगलीच चर्चा होत आहे.

पाहू या काय म्हणाले होते राणे…..

‘‘कोकणामध्ये मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात व जूनच्या सुरुवातीला वादळ येते. त्यामध्ये हलणारी झाडे उन्मळून पडतात. राज्यातील तीन पक्षांचे सरकार तसेच एक झाड आहे. त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत, मुख्य खोडावर नाहीत. ते जून महिन्याच्या वादळात जाणार आहे,’’ असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. राजकारणातील वादळाचा मी अंदाज घेतला असल्याचे देखील ते म्हणाले होते.  

Story img Loader