राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अलीकडेच भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टोलेबाजी केली होती. ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते तर दोनवेळा निवडणुकीत हरले. वांद्रे येथे तर एका बाईने नारायण राणेंना हरवलं, अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली.
अजित पवारांच्या या टोलेबाजीला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं, हे मला माहीत नाही. त्यांनी माझ्या नादी लागू नये, नाहीतर मी पुण्यात येऊन त्यांचे बारा वाजवेन, असा थेट इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “रवींद्र धंगेकरांची उमेदवारी रद्द करा”; भाजपाची निवडणूक आयोगाकडे मागणी, नेमकं कारण काय?
यावेळी अजित पवारांच्या टीकेबाबत विचारलं असता नारायण राणे म्हणाले की, अजितदादाला बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं, हे मला माहीत नाही. खरं म्हणजे मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. तो ज्याप्रकारचा राजकारणी आहे, त्याबद्दल बोलूच नये. बारामतीच्या बाहेर त्याने दुसऱ्यांचे बारसे घालायला जाऊ नये. दुसऱ्यांना नावं ठेवू नये. “माझ्या फंद्यात पडू नका, नाहीतर मी पुण्याला येऊन बारा वाजवेन…” असा थेट इशारा नारायण राणेंनी दिला.
हेही वाचा- “सकाळी एकाबरोबर शपथ घेतात अन् संध्याकाळी…”, ‘त्या’ विधानावरून गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना टोला!
नारायण राणे पुढे म्हणाले, “माझं पहिलं कार्यक्षेत्र मुंबई आहे. पण बाळासाहेब ठाकरेंनी मला कोकणात पाठवलं. तिकडून मी सलग सहा वेळा निवडून आलो. त्यानंतर काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधींनी मला वांद्रे येथून निवडणूक लढवण्यास सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार मी निवडणुकीसाठी उभा राहिलो. मी माझ्या मतदारसंघात उभा राहिलो नव्हतो. पण महिला असो वा पुरुष असो… उमेदवार हा उमेदवार असतो.”
हेही वाचा- नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा उल्लेख करत म्हणाले…
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचा संदर्भ देत म्हणाले, “नारायण राणेंनी शिवसेना फोडली. त्यावेळ सगळे पडले. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना”, असा टोला अजित पवारांनी लगावला.
काय घडलं होतं वांद्रे पोटनिवडणुकीत?
२०१५ मध्ये शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेनं तृप्ती सावंत यांना तिकीट दिलं. तेव्हा त्यांच्याविरुद्ध नारायण राणे यांनी मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला पराभूत करण्याची घोषणाच केली होती. मात्र, त्यांना २० हजार मतांनी तृप्ती सावंत यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. यानंतर २०१९मध्ये मात्र शिवसेनेनं तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारल्यामुळे सावंत यांनी बंडखोरी करत भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेने तिथे मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांनी त्यांचा पराभव केला.