शिवसेनेतील अभूतपूर्व बंडळीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपा (BJP) यांचे संयुक्त सरकार स्थापन झाले आहे. सध्या या सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून ते मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कारभार हाकत आहेत. दरम्यान, सत्ताबदल आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे बंड करणार आहेत, याबाबत कल्पना होती का? असे विचारताच हो मी ज्योतिषी आहे, असे मिश्किल भाष्य राणे यांनी केले आहे.
हेही वाचा >>> Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शाह यांची भेट, राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?
मी वाशिमला गेलो होते. तिथे पत्रकार परिषदेत म्हणालो होतो की सरकार पडणार आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडाबद्दल कल्पना होती का? असे विचारताच “मला याची कल्पना होती, मी ज्योतिषीही आहे,” अशी मिश्किल प्रतिक्रिया राणे यांनी दिली. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. याआधीही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलेलं आहे. हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाही. लवकरच हे सरकार कोसळणार आहे, असे भाकित राणे यांनी यापूर्वी केले होते.
हेही वाचा >>> अमरनाथ गुंफेनजीक ढगफुटी ; यात्रातळावरील १५ जणांचा मृत्यू, ४० जण बेपत्ता; मदत-बचाव कार्य सुरू
मेधा किरीट सोमय्या मानहानी प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी आज अटक वॉरंट जारी केले आहे. भारतीय दंडविधानातील कलम ४९९, ५०० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. राऊतांविरोधातील या कारवाईवरही राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक होणार आहे. याचा अर्थ आहे की त्यांनी कोणतातरी गुन्हा केला आहे,” असे नारायण राणे म्हणाले आहेत..