दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौसेना दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा नौसेना दिन महाराष्ट्रासाठी आणि शिवप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण यंदाचा नौसेना दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्याबाबत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
नारायण राणे म्हणाले, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं वेळापत्रक अद्याप तयार झालेलं नाही. राज्य सरकार आणि नौदल मिळून या कार्यक्रमाचं नियोजन करणार आहेत. नियोजन झाल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ.
दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नारायण राणे यांना विचारलं की, पंतप्रधानांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचा कोकणला काय फायदा होईल? यावर नारायण राणे म्हणाले, “२४ तारखेला येथे एक दौरा झाला. त्याचा काय फायदा झाला?” असं वक्तव्य करताना नारायण राणेंचा रोख हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे होता. कारण आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी कोकणात खळा बैठका घेतल्या होत्या.
हे ही वाचा >> “आमचे दोन तुकडे झाले, आधे इथर, आधे उधर, बाकी सब…”, गुलाबराव पाटलांची डायलॉगबाजी; म्हणाले, “राज्यात आमची…”
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा सिंधुदुर्गचा विषय निघेल तेव्हा आम्ही त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो की, तुम्ही आला होता त्याच भागाबद्दल बोलत आहोत. येथे पर्यटन आणायचं आहे, इतरही अनेक गोष्टी करायच्या आहेत. पंतप्रधान सिंधुदुर्गात आले किंवा त्यांनी पाय ठेवला म्हणजे काहीतरी द्यायलाच पाहिजे असं काही नाही. तशी आमची, भाजपाची किंवा जनतेची मागणी नाही. पत्रकारांची तशी काही इच्छा असेल तर पंतप्रधान आल्यावर तुम्ही त्यांना सांगा. उगाच कुठेतरी चांगल्या वातावरणाला कलाटणी देऊ नका.