Narayan Rane Aditya Thackeray Rajkot fort clash : “राजकोट किल्ल्यावर आलेल्या आदित्य ठाकरेंना खाली मान घालून परत जायला लावलं”, असा दावा भाजपा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. राणे म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी मी राजकोट किल्ल्यावर गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिथे गेलो होतो. तिथे पाहण्यासारखं काही नव्हतं, त्यामुळे मी लगेच तिथून निघालो. दुसऱ्या रस्त्याने निघालो होतो. मात्र त्याच वेळी आदित्य ठाकरे आणि त्यांचे लोक तिथे आले. मात्र मी एक आदेश दिला आणि त्यांना दोन तास तिथेच थांबवून ठेवलं”.
नारायण राणे म्हणाले, “मी किल्ल्यावरून निघालो, वाटेत महादेवाचं मंदिर दिसलं. तिथे थांबून मी नमस्कार केला. तिथेच मला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भेटले. त्यांनी माझी विचारपूस केली आणि तिथून निघून गेले. तेवढ्यात मला काही घोषणांचा आवाज येऊ लागला. मी माझ्याबरोबर असलेल्या पोलीस अधीक्षकांना विचारलं की तिकडे कोण आहे? त्यावर पोलीस अधीक्षक म्हणाले, शिवसेनेच्या ठाकरे गटातील लोक आले आहेत, आदित्य ठाकरे देखील त्यांच्याबरोबर आहेत. मी त्यावर अधीक्षकांना म्हणालो, तुम्ही एकाच वेळी दोन नेत्यांना इथे येण्याची परवानगी कशी काय दिली? मी तुमच्याकडे रितसर अर्ज देऊन येथे आलो आहे. तर तुम्ही याच वेळेला आदित्य ठाकरेंना येथे येण्याची परवानगी द्यायला नको होती. त्यावर अधीक्षक काहीच बोलले नाहीत”.
भाजपा खासदार म्हणाले, “हमसे जो टकरायेगा, वगैरे घोषणांचा आवाज येऊ लागला. आदित्य ठाकरेंबरोबर आमदार वैभव नाईक, विनायक राऊत आणि इतर काही लोक तिथे होते. मी त्या सर्वांना पाहिलं आणि पोलीस अधीक्षकांना म्हटलं, हे लोक इथे आले आहेत खरे, मात्र आता इथून परत जाऊ शकणार नाहीत. त्यावर त्यांनी का असं विचारलं. मग मी त्यांना म्हटलं, माझा हुकूम आहे, मी नाही बोललो तर हे लोक इथून जाऊ शकणार नाहीत”.
त्यानंतर आदित्य ठाकरे मान खाली घालून निघून गेले : नारायण राणे
खासदार राणे म्हणाले, “तब्बल दोन तास आदित्य ठाकरे आणि त्यांच्याबरोबरचे लोक तिथेच थांबले होते. अधून मधून उद्धव ठाकरे यांचा पोलीस अधीक्षकांना फोन यायचा, अधीक्षक बाजूला जाऊन त्यांच्याशी बोलायचे. शेवटी आमचे मित्र जयंत पाटील माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, दादा तुमचं मन मोठ करा आणि त्यांना इथून जाऊ द्या. मी पाटलांना म्हटलं, मी का मन मोठं करू? माझं काय चुकलंय? तुम्ही असे मधून आक्रमण करत आल्यासारखे इथे आलेले आहात. कोणी आमच्यावर आक्रमण केलं तर त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची आम्हाला नेहमीच परवानगी असते”.
हे ही वाचा >> “महाराष्ट्राचं भल व्हावं, असं वाटत असेल तर…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!
नारायण राणे म्हणाले, “मी जयंत पाटलांना सांगितलं, मी इथून कोणालाही जाऊ देणार नाही. त्यानंतर जयंत पाटील तिसऱ्यांदा माझ्याकडे आले आणि म्हणाले, दादा जाऊ द्या त्यांना. मी म्हटलं की बाजूला छोटीशी वाट आहे, त्या वाटेने मान खाली घालून इथून निघून जायला सांगा. कोणी मान वर केली आणि त्याला काही झालं तर मी जबाबदार राहणार नाही. त्यावर जयंत पाटील मला म्हणाले, मी या गोष्टीची जबाबदारी घेतो. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि त्यांचे सगळे लोक खाली मान घालून किल्ल्यावरून निघून गेले”.