शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनावर घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असतानाच त्यावर आता नारायण राणेंनी गंभीर आरोप करत टीका केली आहे. नारायण राणेंनी आज संध्याकाळी मुंबईत भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांच्या त्या पत्रकार परिषदेवर निशाणा साधतानाच संजय राऊतांनी भाजपावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“राऊतांना घाम का फुटला होता?”
पत्रकार परिषदेत संजय राऊतांना घाम फुटला होता, असं राणे म्हणाले आहेत. ती एक आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद होती असं म्हणत त्यांनी उपहासात्मक टीका देखील केली. “संजय राऊत यांची पत्रकार परिषदेला केविलवाणी परिस्थिती झाली होती. घाम फुटला होता. ते वारंवार सांगत होते की मी कुणाला घाबरत नाही. मर्दांची शिवसेना आहे. पण मर्द माणसाला मर्द आहे हे सांगायची गरज नसते. जो घाबरतो, तोच वारंवार सांगत असतो की मी कुणाला घाबरत नाही”, असं राणे म्हणाले.
“पत्रकार परिषदेची जाहिरात सांगत होती की राज्यभरातले नेते, मंत्री येणार. पण साधे विभाग प्रमुखही आले नव्हते. शिवाजी पार्कचे विभाग प्रमुख नव्हते. नाशिकचे मात्र काही मोजके नेते होते. कारण संपर्क प्रमुख आहेत ते”, असं राणे म्हणाले.
“संजय राऊत २ जून १९९२ ला शिवसेनेत आले. सामनामध्ये संपादक म्हणून आले. मार्मिकमधून हकालपट्टी झाली मग लोकप्रभाला गेले. लोकप्रभात असताना त्यांनी पराक्रम केले. त्यांनी तेव्हा बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध अनेक लेख लिहिले. साहेबांनी हा कसा पत्रकार आहे याविषयी बोललं होतं. संजय राऊत अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहात असतो, असं बाळासाहेब म्हणाले होते”, असं देखील राणे म्हणाले. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: अडचणीत आहेत म्हणून घेतली? जणू शिवसेना प्रमुख हेच झालेत अशा आवेशात पत्रकार परिषद घेतली, असं राणे म्हणाले.
“संजय राऊतांना विनंती आहे, त्यांनी एकदा तरी म्हणावं की..”, अतुल भातखळकरांचा खोचक निशाणा!
“संजय राऊतांचा थयथयाट सुरू”
“संजय राऊत का बेजबाबदारपणे घामाघूम होऊन बोलत होते? प्रविण राऊतांनी ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर हा थयथयाट सुरू झाला. का फक्त आरोप करता? पुरावे द्या ना? सुजीत पाटकर संजय राऊतांचे कोण लागतात? त्यांच्या नावाने इतके व्यवहार कसे करता? त्यांच्या कंपनीत संजय राऊतांच्या मुली कशा संचालक असतात?” असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
“संजय राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, यांना हटवा, तुम्हालाच मुख्यमंत्री करतो. उद्धव ठाकरे जेव्हा सरकार स्थापनेबाबत पहिल्यांदा शरद पवारांना भेटायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते. संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे. मी आज ओळखतो का तुम्हाला?” असा आरोप देखील नारायण राणेंनी केला. “उद्धवजींना कळत नाहीय हे (संजय राऊत) तुम्हाला सुरुंग लावतायत. संजय राऊतांना माहिती आहे. आज ना उद्या जागा खाली होणार. आता शिवसेनेत कुणी नाही. मी आहे. आधी शिव्या दिल्या आणि आता गोडवी गातायत”, असं देखील राणे म्हणाले.