शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपावर केलेल्या आरोपांनंतर आज मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. संजय राऊत हे १९९२ मध्ये शिवसेनेत आले त्याआधी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टीका करायचे, असं राणे म्हणाले. संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये राणेंनी राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या पत्रकारितेपासूनच्या प्रवासावरुन भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर २६ वर्षांनी राऊत शिवसेनेत आले असं म्हणत टोला लगावला. नारायण राणेंनी आज संध्याकाळी मुंबईत भाजपा कार्यालयात ही पत्रकार परिषद घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“संजय राऊत २ जून १९९२ ला शिवसेनेत आले. सामनामध्ये संपादक म्हणून आले. मार्मिकमधून हकालपट्टी झाली मग लोकप्रभाला गेले,” असं म्हणत नारायण राणेंनी राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. पुढे बोलताना राणेंनी राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध अनेक लेख लिहिल्याचा उल्लेखही केला. “संजय राऊत अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहात असतो, असं बाळासाहेब म्हणाले होते”, असं देखील राणे म्हणाले. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: अडचणीत आहेत म्हणून घेतली? जणू शिवसेना प्रमुख हेच झालेत अशा आवेशात पत्रकार परिषद घेतली, असा टोलाही राणेंनी लगावला.

शिवसेना, बाळासाहेबांचा आशिर्वाद याबद्दल बोलणारे संजय राऊत हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर २६ वर्षांनी पक्षात आल्याचं सांगत आम्ही निधी गोळा करुन शिवसेना उभारल्याचा उल्लेखही नारायण राणेंनी केला. “तू आलास कधी? शिवसेनेच्या जन्मानंतर २६ वर्षांनी आला. शिवसेना बांधताना आम्ही पैसे गोळा केले. आम्ही ऐवढं केलं म्हणून आता सत्ता आहे. राऊतांचे शिवसेना भवनाच्या उभारणीत त्याचे ५ पैसे तरी आहेत का? कोणाच्या कनाफाटात मारली संजय राऊतने असं कुठे, कधी वाचलं का? उसनं अवसान कशासाठी?” असा एकेरी उल्लेख करत राणेंनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. ज्यापद्धतीने राऊत बोलत होते, आव्हान देत होते ते करण्यासाठी तशी रग लागते, रक्त लागतं तसं असा टोलाही नारायण राणेंनी लगावला.

भाजपा विरोधात केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोपांमध्येही काही तथ्य नाहीय, असं सांगतानाच आरोप खरे असतील तर पत्रकार असणाऱ्या संजय राऊतांनी पुरावे सादर करावेत असं आव्हान नारायण राणेंनी केलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane slams sanjay raut says he came after 26 years after foundation of shivsena scsg