चिपी विमानतळाचं उद्घाटन हा मुद्दा तारीख ठरल्यापासूनच चर्चेत होता. या कार्यक्रमाला कोण कोण येणार इथपासून ते राणे-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्यानंतर काय बोलणार इथपर्यंत चर्चा आणि तर्क लढवले गेले. त्यात शुक्रवारी विमानतळाचं श्रेय आमचंच असं म्हणून राणेंनी या आगीत अजूनच तेल ओतल्याचं चित्र निर्माण झालं. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमात अपेक्षित असलेले आरोप-प्रत्यारोप दिसून आले. नारायण राणेंनी आपल्या भाषणात चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच स्थानिक पातळीवर त्यांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर तोफ डागली. “विमानतळाला विरोध करणारे इथे स्टेजवरच आहेत, भांडं काय फोडायचं आणि किती फोडायचं?” असा सवाल करत नारायण राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
शुक्रवारी माध्यमांशी बोलताना नारायण राणेंनी उद्घाटन प्रसंगी भांडाफोड करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आज राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. विनायक राऊत यांच्याविषयी बोलताना राणेंनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. “याच जागेवर मी आणि प्रभू १५ ऑगस्ट २००९ रोजी भूमिपूजन करायला आलो होतो. तेव्हा समोर आंदोलन होत होतं की भूमिपूजन होऊ देणार नाही, आम्हाला विमानतळ नको. विरोध होत होता. किती विरोध होत होता. मी नावं घेतली तर राजकारण होईल”, असं राणे म्हणाले.
“तुम्ही आलात, आनंद झाला”
“अजित पवार साहेबांनी सीवर्ल्ड प्रकल्पासाठीच्या अधिग्रहणासाठी १०० कोटी रुपये दिले. पण काय झालं? कुणी रद्द केलं? कोण तिथे आंदोलन करत होतं? आहेत स्टेजवर. भांडं काय फोडायचं, किती फोडायचं? तुम्ही समजताय तसं इथे नाहीये. तेव्हा होतं, आज नाहीये. म्हणून परिस्थिती बदलते आहे. मला फक्त म्हणायचंय, तुम्ही आलात, मला बरं वाटलं”, असा टोला राणेंनी यावेळी बोलताना लगावला.
राऊत मला पेढा द्यायला आले, मी म्हटलं…
यावेळी बोलताना नारायण राणेंनी चिपीकडे विमानाने येताना घडलेला प्रसंग सांगितला. “हा जिल्हा सुजलाम सुफलाम करणं हा माझा मानस आहे. असे प्रयत्न कायमस्वरूपी राहतील. त्या अडचणींची मी दखलही घेत नाही. बिचारे राऊत विमानात पेढे घेऊन आले. मी थोडासाच घेतला, कारण डायबेटिस आहे. मी त्यांना म्हटलं राऊतजी, या पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. आत्मसात करा. माझी एवढीच इच्छा आहे की बोलायचं तर चांगलं बोला. हसत बोला. मग लोकांना वाटतं की या व्यक्तीकडे विचार आहे. विचारातून माणसांची मनं जिंकता येतात, हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही”, अशा शब्दांत राणेंनी विनायक राऊत यांच्यावर खोचक टीका केली.
विमानतळाबाहेर रस्त्यावरील खड्डे बघायचे का? चिपीच्या उद्घाटनात नारायण राणेंची राज्य सरकारवर तोफ
“मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण?”
दरम्यान, यावेळी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विनायक राऊत यांनी केल्यावरून देखील राणेंनी खोचक टीका केली. “मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण. वीरेंद्र म्हसकर गेले आणि दुसरे कधी आले कळलंच नाही हो. स्टेजवर आलो, विनायक राऊत हातात माईक घेतात. म्हटलं हा कार्यक्रम कुणाचा आहे? एमआयडीसीचा आहे, म्हसकर साहेबांचा आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे, देसाई कंपनीचा आहे कळलंच नाही. कसला प्रोटोकॉल? मला कळत नाही म्हसकर साहेब आपण राजीनामा दिला की कंपनी विकली. नियमानं करा. मान-सन्मान जनता देईल”, अशा शब्दांत राणेंनी तीव्र नाराजी दर्शवली.
उद्धवजी, गुप्तपणे माहिती घ्या…
नारायण राणेंनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंना उद्देशून शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “बाळासाहेबांना खोटं बोलणं कधीच आवडलं नाही. खोटं बोलणाऱ्याला साहेबांजवळ थारा नव्हता. सगळं तुम्हाला कळतंय पण खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय काम करतायत, याची माहिती गुप्तपणे कुणालातरी नेमून घ्या”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.