नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तव जात नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. नारायण राणे हे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत हे देखील आपण अनेक प्रसंगांमधून पाहिलं आहे. एवढंच काय मला उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना हा पक्ष सोडावा लागला असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. अशात आता नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंबाबत आणि त्यांच्याबाबत बाळासाहेब ठाकरेंनी काय म्हटलं होतं तो किस्सा सांगितला आहे. मुंबई तकच्या बैठक या कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते त्याच कार्यक्रमात त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.
काय म्हटलं आहे नारायण राणे यांनी?
मी शिवसेना सोडणार होतो, मी साहेबांना सांगितलं की मी शिवसेना सोडतो. मी बाजूला होतो, मी कुठे जाणार नाही. मी माझे व्यवसाय सांभाळतो. त्यावर मला बाळासाहेब म्हणाले तू जायचं नाही. कारण मी थकलो आहे मला सोडवा. तेव्हा बाळासाहेब म्हणाले मी हयात असेपर्यंत तू आणि उद्धव तुमच्या दोघांमध्ये मला मतभेद नकोत. मी त्यांना म्हटलं की मतभेदांचा प्रश्न नाही. पण मला येणारे अनुभव काही चांगले नाहीत. तुम्ही म्हणत आहात बाजूला होतो. काहीही झालं की उद्धवकडे पाठवता. त्यांना समजून घेण्याची क्षमता आहे असं मला वाटत नाही असं मी साहेबांना सांगितलं. बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब होते.
ओरिजनल कोण डुप्लिकेट कोण आम्हाला माहित आहे
उद्धव ठाकरेही पूर्वीची शिवसेना घडवू शकत नाही. तसा शिवसैनिक मिळणं कठीण. तेव्हाचा शिवसैनिक आत्ताचा शिवसैनिक यांच्यात फरक पडला आहे. तशी निष्ठा आता मिळू शकत नाही. ओरिजनल शिवसेना एकनाथ शिंदेंची असं म्हटलं तर समोरच्यांना राग येतो ते लगेच सांगतात ठाकरे म्हणजे ओरिजनल. पण डुप्लिकेट कोण आम्हाला माहित आहे. आम्ही तिथले ओरिजनल होतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. कसे झाले? ५६ आमदार असताना त्यांनी आघाडीशी जुळवून घेतलं. माननीय बाळासाहेब हिंदुत्व सोडून पदासाठी कधीही तडजोड केली नसती. साहेब असते तर उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केलं नसतं. माझे वडील बाळासाहेब ठाकरे पण कुठले गुण उद्धव ठाकरेंनी घेतले? हिंदुत्वाचा त्याग करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. तू मुलगा होतास तर तुला डावलून मुख्यमंत्री का केलं होतं? याचं उत्तर आहे का? असंही नारायण राणेंनी विचारला आहे.
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं शिवधनुष्य पेलणार का?
बाळासाहेब ठाकरे यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. आजही मला त्यांची आठवण येते. माझ्याएवढी पदं त्यांनी कुणालाच दिली नाहीत. प्रत्येक पदाला मी न्याय दिला आहे. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते पद या पदांनाही मी दिला. साहेब माझं दैवत होते. माझं वक्तृत्व वेगात बोलायचो. मला एक दिवस बाळासाहेबांनी बोलावलं. मला विचारलं कुठे गेला होतास? मग मला म्हणाले की किती जोरात बोलतोस? कोपरखळी मार. लोकांशी बोलतोस असं समोरच्याला वाटलं पाहिजे हे मला बाळासाहेबांनी शिकवलं. लोकप्रतिनिधी कसा वागला पाहिजे या सगळ्याचं मार्गदर्शन मला बाळासाहेबांनी केलं. मातोश्रीवर सांगितलं की कोकणात चाललो आहे. की विचारायचे ड्रायव्हर कोण आहे? त्याला बोलवून घ्यायचे त्याला सांगायचे झोप वगैरे नीट झाली आहे ना? नारायण राणेंना नीट घेऊन जा. एवढं कोण करतं? बाळासाहेब ठाकरेंसारखं कुणी होणार नाही. एकनाथ शिंदे आमच्यासारखाच शिवसैनिक आहे. त्याला कार्यपद्धती माहित आहे. साहेबांचा फोटो किंवा त्यांचं व्यक्तीमत्व समोर ठेवून काम करतो आहे. मात्र तुलना करू नका असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.