केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबच्या वक्तव्याबद्दल दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर नारायण राणे यांनी टाइम्स नाऊशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. या मुलाखतीमध्येही त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच शिवसेनेवरही टीका केलीय. आपण काही गुन्हाच केला नसल्याचं राणेंनी गाडीमध्ये प्रवासादरम्यान व्हिडीओ कॉलवरुन दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. इतकच नाही तर राणेंनी आता शिवसेनेकडे शिवसैनिकच राहिले नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेकडे कार्यकर्तेच कुठे आहेत असा प्रश्न राणेंनी या मुलाखतीमध्ये उपस्थित केलाय.
नक्की वाचा >> अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले…
नारायण राणेंच्या या मुलाखतीदरम्यान त्यांना अटक झाल्यानंतर काय काय घडलं हे सांगत एक प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला अटक झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवरुन संताप व्यक्त केलाय. राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही संपूर्ण भाजपा राणेंच्या पाठीशी उभा असेल असं म्हटलं आहे. मात्र असं असतानाच दुसरीकडे शिवसैनिकांनी मात्र संपूर्ण मुंबईमध्ये भाजपावर हल्लाबोल केलाय, असं मुलाखत घेणारी माहिला म्हणाली. त्यावर नारायण राणेंनी उत्तर देताना, “ते काय हल्ला करणार. १०-१५ लोक येतात हे मी पाहिलं आहे. संगमेश्वरमध्ये (आंदोलनात) १२ लोक होते चिपळूणमध्ये १७ लोक होते. त्यांच्याकडे माणसेच (कार्यकर्तेच) कुठे आहेत?,” असा उलट प्रश्न राणेंनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> “तुम्हाला रात्र पोलीस कोठडीमध्ये घालवावी लागणार”, असं ऐकताच नारायण राणे म्हणाले…
उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू…
अटक झाल्यानंतर या वृत्तवाहिनीला व्हि़डीओ कॉलच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना नारायण राणेंना उद्धव ठाकरेंना काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणेंनी, “उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन,” असं उत्तर दिलं. मुलाखत घेणाऱ्या माहिलेने “उद्धव ठाकरेजी को क्या कहेंगे?”, असं विचारलं असता राणेंनी “कुछ नही कहुंगा…” असं म्हणत एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन, असं उत्तर दिलं. “ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत, अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजाकरणामध्ये आहोत,” असं सूचक वक्तव्य राणेंनी केलं. यावेळीही त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला.
नक्की वाचा >> नारायण राणेंना गाडीमध्ये बसून पोलीस घेऊन जात असतानाच निलेश राणेंनी…
अटक झाली तेव्हा काय घडलं?
अटक झाली तेव्हा नक्की काय घडलं याबद्दलही नारायण राणेंनी यावेळी भाष्य केलं आहे. “गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे मी दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास जेवत असतानाच अचानक तिथे डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असं मला सांगितलं. मी त्यांना नोटीस दाखवा असं म्हटलं. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन इथे संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणलं. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले. आता मला कोकणातील महाड येथे नेलं जात आहे,” असं राणे म्हणाले.
पोलीस कोठडीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता…
मुलाखत घेणाऱ्या माहिलेने नारायण राणेंना अशाप्रकारे मंत्री असताना एखाद्या राज्याच्या पोलिसांनी नेत्याला अटक करण्याची ही महाराष्ट्रामधील बऱ्याच कालावधीतील पहिलीच घटना आहे असं सांगतानाच आता तुम्हाला संपूर्ण रात्र पोलीस कोठडीमध्ये काढावी लागेल असं विचारलं. त्यावर उत्तर देताना, “मला रात्रभर तुरुंगामध्ये रहावं लागेल असं मी काही वक्तव्य केलेलं नाही. मी जे म्हणालो आहे ते कायद्याच्या भाषेत ऑफेन्स होत नाही. तुम्ही याबद्दल कोणत्याही वकिलाला विचारु शकता. मला जबरदस्तीने लॉकअपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. यामध्ये माझा काहीच गुन्हा नाहीय,” असं राणे यांनी सांगितलं.