केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मंगळवारी (२४ ऑगस्ट) राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. राज्यभर तीव्र स्वरूपाची आंदोलन, प्रतिक्रिया आणि भूमिका पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर महाविकासआघाडी सरकारमधून देखील अगदी तिखट प्रतिक्रिया आल्या. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी मंगळवारी दुपारी झालेली अटक, रात्री उशिरा मिळालेला जामीन आणि त्यादरम्यान घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आज (२५ ऑगस्ट) अखेर नारायण राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी राणेंनी फक्त शिवसेना नव्हे तर महाविकास आघाडी सरकारलाच इशारा दिला आहे.
“महाविकास आघाडी सरकार हे तर फक्त ‘कुछ दिनो का मेहनाम’ आहे”, असा स्पष्ट इशारा यावेळी नारायण राणे यांनी दिला आहे. खरंतर भाजपापडून वारंवार हे सरकार पडण्याचे आणि पाडण्याचे दावे झाले आहेत. आता पुन्हा एकदा नारायण राणे यांच्याकडून देखील महाराष्ट्रातही सत्तांतराचा हा सूचक इशारा देण्यात आला आहे. “त्यांना वाटतं ते खूप कर्तृत्ववान आहेत. पोलिसांना नुसते सांगतात ह्याला पकड, त्याला पकड. त्यांना वाटतं कायमस्वरूपी त्यांचंच सरकार असेल. पण लक्षात घ्या ते फक्त ‘कुछ दिनो का मेहनाम’ आहेत”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी इशारा दिला आहे.
महाराष्ट्रासारखं प्रगत राष्ट्र आज अधोगतीकडे चाललं!
नारायण राणे यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका करताना म्हटलं आहे कि, “महाराष्ट्रासारखं प्रगत राष्ट्र आज अधोगतीकडे चाललं आहे, बघा. करोनामध्ये १ लाख ५७ हजार मृत पावली. देशातील मृत्यूपैकी एक तृतीयांश मृत्यू महाराष्ट्रात झाले. काय पराक्रम आहे? शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, शिक्षणाचे असे कोणते प्रश्न हाताळले? ह्यावर बोलायचं नाही? लोकांची बाजू घेणं हे आमचं कर्तव्य आहे.”
“मी असं काय बोललो कि …?”
नारायण राणे यांनी आपल्या या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले. “मी असं काय बोललो ज्याचा एवढा राग आला? ते वाक्य काय परत बोलणार नाही. पण प्रश्न असा आहे की एखादी गोष्ट भूतकाळात घडली आणि त्याची माहिती दिली तर तो कसा गुन्हा होता? शिवसेनेच्या नेत्यांनी कधी असे शब्द उच्चारले नाहीत? मुख्यमंत्री म्हणाले सेनाभवना बद्दल कोणी असं बोललात तर थोबाड फोडेन. थेट असे आदेश देण्यात आले. हा गुन्हा होत नाही?” असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.