मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर भाषण केलं. या भाषणात त्यांनी आपल्या विरोधात अपप्रचार कसा केला गेला याबाबत भाष्य केलं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंवरही टीका केली. उद्धव ठाकरेंनी मी शिवसेनेत असताना मी पक्ष सोडून कसा जाईन ही परिस्थिती निर्माण केली होती. तसंच नारायण राणेंनीही पक्ष सोडलाच नसता असंही राज ठाकरे म्हणाले. नारायण राणेंनी जाऊ नये म्हणून मी त्यांना फोन केला होता असंही राज ठाकरेंनी सांगितलं आणि तो प्रसंग सांगितला.
काय म्हणाले राज ठाकरे नारायण राणेंबाबत?
नारायण राणेंनी शिवसेनाच सोडली नसती. मी तुम्हाला तो प्रसंग सांगतो. नारायण राणे पक्ष सोडणार हे कळलं होतं. मी त्यांना फोन केला, मी त्यांना म्हटलं अहो राणे हे काय करताय? शिवसेना सोडू नका. नारायण राणे मला म्हणाले की मला जायचं नाही पण..त्यावर मी त्यांना सांगितलं की बाळासाहेबांशी बोलतो. राणेंचा फोन ठेवल्यावर मी लगेच बाळासाहेबांना फोन केला. त्यांना सांगितलं नारायण राणेंना शिवसेना सोडायची नाही. मला बाळासाहेबांनी लगेच सांगितलं त्याला घेऊन ये. मी नारायण राणेंना फोन केला आणि सांगितलं बाळासाहेबांनी बोलावलं आहे आपण जाऊ ते म्हणाले मी लगेच निघालो. हा फोन झाल्यानंतर पाच मिनिटांनी मला बाळासाहेबांनी फोन केला. मला म्हणाले नारायण राणेंना आणू नकोस, तेव्हा त्यांच्या मागून कुणीतरी बोलत होतं हे माझ्या लक्षात येत होतं. बाळासाहेबांनी फोन करून येऊ नकोस सांगितल्यावर मला राणेंना सांगावं लागलं की येऊ नका.मग सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्या. लोकांनी बाहेर पडावं यासाठी परिस्थिती निर्माण केली गेली. तेव्हा शिवसेनेत जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा शेवट हा आता असा झाला. मला उद्धव ठाकरेंच्या राजकारणाशी काहीही घेणंदेणं नाही. असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.
त्यावेळी अनेक गोष्टी राजकारणातून झाल्या , घरातून झाल्या
अनेक गोष्टी तेव्हा झाल्या.. राजकारणात झाल्या. घरातून झाल्या. आज जर माननीय बाळासाहेब असते तर मागची दोन-अडीच वर्षे झालं ते होऊ दिलं असतं का? सहानुभूती मिळवण्यासाठी सगळीकडे फिरायचं याने हे केलं त्याने ते केलं हे सांगायचं. अरे तू का शेण खाल्लं? अडीच वर्षांपूर्वीची स्थिती आठवा. भाजपा आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. मतदानाचा अधिकार तुमचा आहे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सगळ्या लोकांनी मतदान केल्यानंतर हे यांचा खेळ खेळत बसणार? निवडणूक संपल्यावर निकाल आले तेव्हा एकत्र निवडणूक लढवून, उद्धव ठाकरेंनी सांगितलं अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मान्य केलं होतं. निवडणुकीच्या प्रचारात बोलला होतात? मला चार भिंतीत अमित शाह यांनी सांगितलं मग जाहीर का नाही केलं? मोदी जेव्हा सांगत होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार तेव्हा आक्षेप का घेतला नाहीत? त्यावेळी वागलात त्यामुळे ही परिस्थिती आता ओढवली असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंबाबतही भाष्य
अलीबाबा आणि चाळीसजण जूनमध्ये गेले. त्यांना चोर म्हणणार नाही कारण ते चोर नाहीत. यांनाच कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली. कोव्हिडच्या काळात उद्धव कुणाला भेटायला तयार नव्हता. एक आमदार भेटायला गेला मुलाला घेऊन तर मुलाला बाहेर ठेवलं आणि आमदाराला भेट दिली. हे असं वागल्यावर २१ जूनला कळलं आपल्याला एकनाथ शिंदे सुरतला गेले. मग पुढे गुवाहाटीला गेले. महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच. मग गुवाहाटी, गोवा असा प्रवास करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत. एकनाथ शिंदेंना एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रासाठी काम करा. उद्धव ठाकरे सभा घेतात तिथे उत्तर द्यायला सभा घेऊ नका.