कोकणवासियांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी पदरचे कोटय़वधी रुपये खर्च करीत असल्याचा आव आणणाऱ्या उद्योगमंत्री नारायण राणे यांना नाममात्र सरकारी कराचे मात्र वावडे असल्याचे चित्र समोर आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीसाठी असणारा दोन लाख रुपयांचा अकृषिक कर भरावा लागू नये यासाठी तो माफ करण्याची विनंती राणे यांच्या संस्थेने सरकारकडे केली आहे. राणे यांच्या महाविद्यालयासाठी नियमांची मोडतोड करणाऱ्या सरकारी यंत्रणेनेही आता राणे यांना दोन लाख रुपयांचा ‘भरूदड’ पडू नये यासाठी तत्परतेने प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी चालविली आहे.
राणे यांच्या ‘सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळा’तर्फे पडवे येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याकरिता संस्थेने सावंतवाडी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडून अकृषिक परवाना मिळविला आहे. या अकृषिक परवान्यासाठी जमिनीचा थकित महसूल कर भरणे आवश्यक होते. मात्र संस्थेचे सतीश सावंत यांनी कुडाळच्या तहसिलदारांकडे अर्ज करून सुमारे दोन लाख रुपये देय असलेला शेतसारा माफ करण्याची मागणी केली आहे. ‘आम्ही या जमिनीचा वापर शैक्षणिक कारणासाठी करणार आहोत. त्यामुळे, शेतसाऱ्यातून माफी मिळावी,’ असे संस्थेचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे तहसिलदारांनीही तत्परतेने शेतसारा माफीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसली तरी राणेंसाठी सरकारी यंत्रणा कशा कार्यतत्पर होतात, याचेच प्रत्यंतर आले आहे. राणेंच्या संस्थेने या जमिनीवर बांधकामही सुरू केले आहे. प्रत्यक्ष बांधकामाच्या स्थळी जाऊन चौकशी केल्यानंतर ही इमारत केवळ महाविद्यालयाची असल्याचे सांगण्यात आले. त्यात रुग्णालयाचा पत्ताही नाही. पडवे येथील नियोजित प्रकल्पस्थळी जाण्यासाठी सिंधुदुर्ग ते कसाल या मालवण मार्गावरून गेल्यास रेल्वे रुळाबाजूच्या वरील भागावरून जावे लागते. अद्यापी हा मार्गही कच्चा आहे. इमारतीचा केवळ पहिला स्लॅब तयार झाला आहे. बांधकामाला आणखी वर्ष तरी लागेल, असे कामगार सांगतात. सध्या महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असून नंतर रुग्णालयाचा विचार होईल, असे समजले.
खडी,वाळूच्या साठय़ाचे गुपित
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे फेब्रुवारी, २०१२ पासून गौण खनिज उत्खननावर बंदी आहे. या बंदीमुळे जिल्हाधिकारी इ. रविंद्रन यांनी हल्लीच चिरे, खडी, वाळू उत्पादकांच्या खाण प्रकल्पांना सील ठोकले होते. पण, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री असलेल्या राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी मात्र खडी आणि वाळूचा प्रचंड साठा आहे. हा साठा इतका मोठा आहे, की संपूर्ण प्रकल्पाला पुरेल. जिल्ह्य़ात गौण खनिज उत्खननाला बंदी असताना इतकी खडी आणि वाळू आली कुठून असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आहे. (समाप्त)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा