शफी पठाण
जिच्या खळाळत्या प्रवाहाच्या साक्षीने राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आत्मिक आवाजाचे सामर्थ्य जगाला सप्रमाण सांगण्यासाठी ‘सत्याचे प्रयोग’ केले त्या वरदा नदीचा काठ आज गजबजलाय. या काठावर सध्या ‘साहित्याचे प्रयोग’ सुरू आहेत. एक प्रयोग होतोय अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या मांडवात, तर दुसरा तिकडे विद्रोहीच्या छताखाली. आश्चर्य म्हणजे, गांधी दोन्हीकडे दिसताहेत. गांधी विचारांचे खरे पाईक कोण, याची जणू एक सुप्त स्पर्धा सुरू आहे. हा द्वंद्व समास रंगलाय तोच मुळी संमेलनाध्यक्षाच्या निवडीपासून. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाची सांधेजोड सांगणारे माजी न्या. नरेंद्र चपळगावकर हे प्रस्थापितांच्या संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि विस्थापितांनाही गांधी नव्याने खुणावू लागले.
गांधींनी शिकविलेली निर्भयता दुबळी पडू नये, यासाठी गांधींचे असे खुणावणे अपरिहार्यच. म्हणून मग विद्रोही संमेलनाच्या आयोजकांनी ‘गांधी सांगणारा’ अध्यक्ष शोधायला सुरुवात केली. अखेर चंद्रकांत वानखडेंजवळ येऊन हा शोध थांबला. हे वानखडे तेच आहेत ज्यांनी ‘गांधी का मरत नाही?’ हे पुस्तक लिहून गांधींचा तिरस्कार करणाऱ्यांना चंबळ खोऱ्यातले आणि भिंड-मुरेना जिल्ह्यातले डाकूही आपल्या बंदुका गांधींच्या पायाशी का टाकत होते, हे सांगितले आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला मावळतीचे रंग गहिरे होत असताना आता दोन्ही मांडवांसमोर गांधींचा गजर जोरात सुरू आहे. प्रस्थापितांच्या मांडवातला गांधी पांढरपेशांना एका नव्या लढय़ासाठी साद घालतोय, तर विद्रोहींच्या मांडवातला गांधी फुले, शाहू, आंबेडकरांच्या साक्षीने शोषित, दुबळय़ा, वंचित वर्गाची व्यथा मांडतोय. दोन्ही मांडवातली साहित्यिक सुभेदारी वेगवेगळी वाटत असली तरी पहिल्यांदा या दोन्ही मांडवांतून एकसारखा विचार वर्धेच्या आसमंतात निनादतोय. गांधी विरुद्ध इतर कुणी असे नाही तर गांधी अधिक गांधी असे चित्र गांधींच्या या कर्मभूमीत दिसतेय. विद्वेषाच्या या काळात गांधींचे असे ‘अधिकाधिक’ होणे, हे शुभसंकेत आहेत.