Narendra Maharaj on Maharashtra Assembly Election Results: गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व पर्यायाने महायुतीची मोठी पीछेहाट झाली. त्यामुळे राजकीय चित्र बदलल्याचं बोललं जात असतानाच पाचच महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं २८८ जागांपैकी १३२ जागा जिंकून आणल्या. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला ५६ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ४१ जागा मिळाल्या. पण महायुतीला मिळालेला हा अभूतपूर्व विजय लाडकी बहीण योजनेमुळे नसून साधू-संत, संघामुळे मिळाला असल्याचं विधान नरेंद्र महाराज यांनी केलं आहे. रत्नागिरीत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रत्नागिरीमध्ये आयोजित कार्यक्रमात कोकणातील अनेक राजकीय नेतेमंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला नरेंद्र महाराज प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. या कार्यक्रमानंतर नरेंद्र महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजकीय नेतेमंडळींवर टीका केली. तसेच, आम्ही ठरवलं, तर राजकारण्यांना खुर्चीवरून खाली खेचू शकतो, असं नरेंद्र महाराज यावेळी म्हणाले.

“राजकीय लोक आमचा आवाज दाबून टाकतात”

यावेळी नरेंद्र महाराज यांनी राजकीय लोक संतांचा आवाज दाबून टाकत असल्याची खंत व्यक्त केली. “राजकीय लोक आमचा आवाज दाबून टाकतात. त्यामुळे त्यांना घाबरून चालणार नाही. राजकीय उलथापालथ करणं गरजेचं आहे. आमचं हिंदूंचं रक्षण केलं नाही, तर आम्ही तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचू शकतो हा जनतेनं राजकीय लोकांपर्यंत संदेश पोहचवायला हवा”, असं ते म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचा परिणाम नाही – नरेंद्र महाराज

“गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत चित्र वेगळं होतं. पण विधानसभेच्या निवडणुकीत संघ आणि आम्ही सर्व साधू-संतांनी मिळून चित्र बदललं आहे. बाकी त्यांनी काहीही दावा करावा. लाडकी बहीण योजना वगैरे.. त्याचा मुळीच परिणाम नाहीये. आम्हा साधूसंतांचा हा परिणाम आहे. आम्ही सर्व साधू-संतांनी हिंदू धर्मातील लोकांना जागृत केलं की बदल ही काळाची गरज आहे. जागृत व्हा. त्यातून हे चित्र उभं राहिलं”, असा दावा नरेंद्र महाराज यांनी केला आहे.

“अजित पवारांनाही विजयाची खात्री नव्हती”

दरम्यान, नरेंद्र महाराज यांनी यावेळी अजित पवारांनाही १० ते १२ जागाही निवडून येतील याची खात्री नव्हती, असं विधान केलं आहे. “खुद्द अजित पवारांनाही खात्री नव्हती की त्यांच्या १० ते १२ जागा येतील. ते चित्र बदललं. एकनाथ शिंदेंना वाटतंय की लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना मोठा विजय मिळाला. तसं मुळीच नाहीये. आम्हा साधू-संतांचं त्यामागे योगदान आहे. मुस्लीम समाज हिंदू संपवण्यासाठी, आपल्या ऐक्यासाठी ज्यांना विरोध होतो त्यांच्यामागे हिरवे झेंडे घेऊन उभा राहात असेल तर आम्ही हिंदूंनी जागृत झालं पाहिजे. संतांनी जागृत झालं पाहिजे. आम्ही ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं. त्यातून विधानसभेला चित्र बदललेलं दिसलं”, असंही ते म्हणाले.

“दिल्ली विधानसभा निवडणुकीतलं चित्रही त्यामुळेच बदललं आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात एक चांगली गोष्ट झाली आहे. आम्ही डरेंगे तो मरेंगे हा संदेश दिला, त्यातून सगळे संत जागृत झाले. आमचे शंकराचार्य कुंभमेळ्यापासून लांब राहायचे. त्यांनाही त्यात उतरावं लागलं. त्यातून फार मोठी जनजागृती झाली आहे”, असा मुद्दा नरेंद्र महाराज यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader