‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मागे गोध्रा हत्याकांडानंतर पोलिसांचा ससेमिरा होता. तो वाचविण्यासाठी ते आवर्जून खुलताबादच्या दक्षिणमुखी मारुतीला यायचे. त्यांच्यासाठी नेहमीच तेथील अभिषेकाची व्यवस्था मी करायचो. त्यामुळे कालच्या अभिषेकालाही वैयक्तिक मदत केली.’ ही वक्तव्ये आहेत खासदार चंद्रकांत खैरे यांची. केवळ एवढेच नाहीतर या मारुतीच्या आशीर्वादामुळेच नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पक्षातून अभय मिळाले होते, असा अचाट गौप्यस्फोट खासदार खैरे यांनी रविवारी एका पत्रकार बैठकीत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मराठवाडय़ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांचा रविवारी दौरा होता. ते औरंगाबाद येथे पत्रकार बैठक घेणार होते. ते नियोजित वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे पत्रकारांसमोर खासदार खैरे आले. दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे सांगितल्यानंतर शनिवारच्या अभिषेकाचा विषय सहज छेडला गेला आणि खैरेंची गाडी सुटली. अभिषेकाचा खर्च शिवसेनेचा की भाजपचा, असे विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, ‘गुजरातहून हिरेन पाठक यांनी रावळजी नावाच्या व्यक्तींना पाठविले होते. त्यांना हा मारुती स्वप्नात यायचा. तत्पूर्वी त्यांनी ७५० मारुतींचे दर्शन घेतले होते. त्यांना अचानक दक्षिणमुखी मारुती दिसला. तेव्हा त्यांनी पूजा केली. पुढे अमित शहांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा होता, तेव्हा तेदेखील दक्षिणमुखी मारुती मंदिरात यायचे. गोध्रा हत्याकांडानंतर नरेंद्र मोदी यांना भाजपत ठेवूच नये, अशी भूमिका काही जणांनी मांडली होती. तेव्हा ते अडचणीत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यासाठी शब्द टाकला. तत्पूर्वीदेखील कृष्णा महाराजांकरवी दक्षिणमुखी मारुती मंदिरात पूजा केली होती. शनिवारी सकाळी अमित शहा यांनी सांगितले, ‘‘चंद्रकांतजींना सांगा, पूजा करायची आहे.’’ म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसा निरोप दिला आणि अभिषेकाची सगळी तयारी मी करून दिली.’ जाता जाता अभिषेकासाठी बरेच पैसे लागतात, असेही सांगायला खैरे विसरले नाहीत. त्यांच्या या महिमा वाढविण्याच्या वक्तव्याने सारेच अवाक् झाले.
नागपूर अधिवेशनात गोंधळ होईल म्हणून पुन्हा नव्याने संघाची मध्यस्थी सुरू आहे. हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ‘सध्यातरी’ आम्ही विरोधी पक्षात आहोत, असे खैरे म्हणाले. सध्यातरी या शब्दाचा अर्थ काय, असा प्रश्न विचारला असता संघ मध्यस्थी करत असल्याचे त्यांनी सांगितले. ही मध्यस्थी आपणास माध्यमातूनच कळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मोदी आणि अमित शहांचा संकटमोचन दक्षिणमुखी मारुती..’
‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मागे गोध्रा हत्याकांडानंतर पोलिसांचा ससेमिरा होता. तो वाचविण्यासाठी ते आवर्जून खुलताबादच्या दक्षिणमुखी मारुतीला यायचे. त्यांच्यासाठी नेहमीच तेथील अभिषेकाची व्यवस्था मी करायचो. त्यामुळे कालच्या अभिषेकालाही वैयक्तिक मदत केली.’
![‘मोदी आणि अमित शहांचा संकटमोचन दक्षिणमुखी मारुती..’](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/07/chandrakant_khaire1.jpg?w=1024)
First published on: 17-11-2014 at 01:40 IST
TOPICSऔरंगाबाद (Aurangabad)Aurangabadचंद्रकांत खैरेChandrakant Khaireनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJP
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi amit shah chandrakant khaire