भारत बंदच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये सावधगिरी

महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने उद्या, १० सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पेट्रोल पंपावरील छायाचित्रांवर शाई फेकण्याचा प्रकार घडला. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चंद्रपुरातील बहुतांश पेट्रोल पंप धारकांनी मोदींचे छायाचित्र असलेले फलक काढून टाकले.

काँग्रेसच्या बंदला समविचारी पक्षांनीही पाठिंबा दर्शवला असून शहर व ग्रामीण काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, बसपा, समाजवादी पक्ष, मनसे यांच्यासह इतर सर्व मित्र पक्षांना सोबत घेण्यात आले आहे. हा बंद यशस्वी व्हावा, यासाठी काँग्रेसच्या वतीने लोकांमध्ये जनजागृती केली जात असतानाच पेट्रोल, डिझेल, गॅस, सिलेंडर तथा महागाईला पंतप्रधान नरेंद्र मोदीच कारणीभूत असल्याचे ठासून सांगितले जात आहे. त्यामुळे शहरातील काही पेट्रोल पंपावरील पंतप्रधानांच्या छायाचित्रांना लक्ष्य करीत शाई फासण्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. शहरात बहुतांश पेट्रोल पंपावर प्रधानमंत्र्यांची छायाचित्रे आहेत. तीसुद्धा लक्ष्य ठरू शकतात. त्यामुळे प्रधानमंत्र्यांची छायाचित्रे असलेले फलक  पेट्रोल पंप धारकांनी  काढून टाकले.

बंद यशस्वी करण्याचे आवाहन

सोमवारी आयोजित बंद यशस्वी करावा, असे आवाहन काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर, ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, मनोहर पाऊणकर, विनायक बांगडे, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, चित्रा डांगे, सुनीता अग्रवाल यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे.