जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मध्ये न्हावाशेवा येथे १२०० हेक्टर क्षेत्रावर सुरू होणाऱ्या विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ)ची पायाभरणी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी केंद्रीय जहाज बांधणी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के. शंकरनारायणन, विनोद तावडे, एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते जेएनपीटी प्रकल्पबाधित लोकांना विकसित भूखंडाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी जेएनपीटीच्या माध्यमातून भुमिपुत्रांना रोजगार मिळावा, हाच या प्रकल्पामागे एकमेव उद्देश असल्याचे सांगितले. वैश्विक व्यापाराच्या दृष्टीने सागरी वाहतुकीला विशेष महत्व असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष पुरविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगातील दोन तृतीयांश सागरी व्यापार हिंदी महासागरातून होत असल्याने भारताला या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले. त्यासाठी देशातील बंदरांचा विकास आणि सागरी वाहतुकीच्या ठिकाणांची जोडणी यांना विशेष प्राधान्य देण्यात आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी ‘सागरमाला’ योजनेतंर्गत सरकार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच देशातील निर्यात क्षेत्राला चालना देण्यासाठी आगामी काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज यावेळी मोदींनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा