Narendra Modi Badlapur Assualt, Kolkata Murder Case : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यात लखपती दिदींचा मेळावा संपन्न झाला. मोदी यांच्या हस्ते आज (२५ ऑगस्ट) काही लखपती दिदींना प्रमापत्रं वितरित करण्यात आली. बचत गटाना शासकीय बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे, त्यातून उद्योग सुरू करणे, नव्या उद्योगातून निर्माण होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे व या सगळ्यातून बचत गटाच्या माध्यमातून तीन कोटी लखपती दीदी तयार करणे हे केंद्र सरकारचे उद्दीष्ट असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. तसेच ते म्हणाले, मागील दोन महिन्यांत आपण ११ लाख लखपती दिदी तयार केल्या असून एकट्या महाराष्ट्रात ही संख्या एक लाख आहे.
दरम्यान, कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. पाठोपाठ महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर येथील एका शाळेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सुरक्षेवर बोलावं, बदलापूर, कोलकाता प्रकरणावर बोलाव, देशभरात वाढलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर बोलावं अशी मागणी होत होती. अखेर जळगावातील कार्यक्रमात मोदी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलले.
“…तर कारवाईस दिरंगाई करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई होणार” : मोदी
नरेंद्र मोदी म्हणाले, महिलांविरोधातील अपराध अक्षम्य पाप आहे. अशा प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, त्याला शिक्षा व्हायला हवी. तसेच कोणत्याही रूपात त्याला मदत करणारे शिक्षेपासून वाचले नाही पाहिजेत. रुग्णालय असो, शाळा, कार्यालय किंवा पोलीस व्यवस्थेतील कोणीही कोणत्याही स्तरावर कारवाई करताना बेजबाबदारपणे दाखवला, गांभीर्य न बाळगता कारवाईस टाळाटाळ केली तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. वरपासून खालपर्यंत सगळ्यांसाठी एक थेट संदेश असला पाहिजे की महिलांवरी अत्याचार हे अक्षम्य पाप आहे.
हे ही वाचा >> Kolkata Doctor Murder : विकृतीचा कळस; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून पैसे कमावण्याचा प्रयत्न; पीडितेच्या नावाने…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सरकारे येतील – जातील, परंतु एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचं रक्षण व्हायला हवं. महिलांच्या चारित्र्याचं रक्षण व्हायला हवं. आपण एक समाज म्हणून, एक सरकार म्हणून त्यांचं संरक्षण करायला हवं. तेच आपलं मोठं कर्तव्य आहे.