केंद्र आणि राज्य सरकारच्या युवक आणि क्रीडा विभागातर्फे येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, १२ जानेवारी रोजी नाशिकला येणार आहे. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. तसंच, उद्याच पंतप्रधान मोदी विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी नवी मुंबईतही येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्याचा दौरा कसा असेल याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी सविस्तर माहिती दिली.
विकसित भारत २०४७ या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय युवा महोत्सव १२ ते १६ जानेवारी या कालावधीत शहरात होत आहे. महाराष्ट्राला १६ वर्षानंतर ही संधी मिळाली आहे. या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता येणार होते. परंतु, मोदी आता निश्चित वेळेच्या एक तास आधी नाशिकला पोहोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला १० वाजता पोहोचणार आहेत. पंतप्रधान मोदी हे विमानाने ओझर विमानतळावर येतील. तेथून हेलिकॉप्टरने शहरात दाखल होतील. कार्यक्रम स्थळापासून जवळच असणाऱ्या निलगिरी बाग येथे हेलिपॅड उभारण्यात आले आहे. पंतप्रधानांचा शहरातील कार्यक्रम दीड तासांचा आहे. हेलिपॅड ते कार्यक्रम स्थळ असा दोन किलोमीटरचा रोड शो होईल तिथून ते रामघाटावर जातील. तिथे जाऊन ते जलपूजन करणार आहेत. जलपूजन झाल्यानंतर ते काळाराम मंदिरात जाणार आहेत.
अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होत असताना रामभूमी नाशिकमध्ये हा महोत्सव होत आहे. त्यानिमित्ताने ते पंचवटी येथील काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. यानंतर ते तिथून सभास्थानी पोहोचतील. दुपारी १२.१५ च्या सुमारास ते नाशिकमध्ये २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने युवक एकत्र येणार आहेत. महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही कमतरता ठेवली जाणार नाही. राज्यातील दीड ते दोन लाख युवक-युवती त्यात सहभागी होणार असल्याचंही सरकारकडून सांगण्यात येत आहे.
नाशिक दौऱ्यानंतर येणार नवी मुंबईत
नाशिक दौरा पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. दुपारी ३.३० वाजता ते एमटीएचएलचे उद्घाटन करतील आणि या अटलसेतूवरुन प्रवास करीत नवी मुंबईतील सभास्थळी जातील. दुपारी ४.१५ वाजता नवी मुंबईतील सभास्थानी विविध प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन, शुभारंभ, भूमिपूजन करतील आणि सभेला संबोधित करतील. त्यानंतर मुंबई विमानतळावर येऊन सायंकाळी सहाच्या सुमारास नवी दिल्लीला रवाना होतील.
हेही वाचा >> पंतप्रधानांच्या आगमनासाठी उलवे, नवी मुंबई परिसर सज्ज
बेलापूर ते पेंधर धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने १२ जानेवारीला उलवा येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील मंडपातून करण्यात येणार आहे. मोदी यांच्या हस्ते विविध सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यात नवी मुंबई मेट्रोचाही समावेश असल्याचे यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले होते.