लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्वाधिक २५० पर्यंत जागा मिळतील. सत्ता स्थापनेसाठी उर्वरित कमी पडणाऱ्या जागा मिळविताना नरेंद्र मोदी हेच अखेर पंतप्रधान होतील. इतर कोणाचाही विचार होणार नाही, असा दावा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. सध्या कुंपणावर असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रालोआमध्ये स्थान मिळेल, अशी वेळ येणार नाही, असाही दावा मुंडे यांनी केला.
रविवारी सायंकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने आयोजिलेल्या वार्तालाप कार्यक्रमात मुंडे बोलत होते. महाराष्ट्रात यापूर्वी युतीला लोकसभेच्या ३३ जागा मिळाल्या होत्या. हा विक्रम मोडीत काढत यंदा ३५ जागा महायुतीला मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभापाठोपाठ आता विधानसभा निवडणुका जिंकण्याची तयारी हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाची लोकसभा निवडणूक अटीतटीची ठरली. प्रमुख राष्ट्रीय पक्षातच झालेल्या या निवडणुकीत वैचारिक ध्रुवीकरण झाले. अखेरच्या टप्प्याचा प्रचार संपला असताना मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआला सत्तेची संधी मिळणार असल्याचे चित्र स्वच्छपणे दिसू लागले आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या १८३ जागा रालोआला मिळाल्या होत्या. देशात कधी ना कधी ३२५ जागा जिंकण्याचा रालोआचा मनसुबा असून त्यादिशेने वाटचाल सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून यंदा लोकसभेच्या २४० ते २५० जागांपर्यंत मजल गाठता येणार आहे. आतापर्यंत भाजपची ताकद केवळ उत्तरेतच असल्याचे बोलले जायचे, परंतु आता दक्षिणेतही भाजप चांगले यश संपादन करील. २७२ जागांचा आकडा गाठताना कितीही अडचण झाली तरी ती दूर केली जाईल. यात कोणतीही राजकीय तडजोड न होता किंवा अन्य कोणालाही संधी न मिळता केवळ नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील,असा दावा मुंडे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार पराभूत होणार हे लक्षात येताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कुंपणावर बसले आहेत. सत्तेशिवाय त्यांना चैन पडत नाही, हे खरे असले तरी उद्याच्या नरेंद्र मोदीप्रणीत रालोआ सरकारमध्ये पवार यांना संधी मिळेल, अशी परिस्थितीच येणार नाही, असेही मुंडे यांनी निक्षून सांगितले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या नाहीत, हे म्हणणे खोटे असून राष्ट्रवादी लढत असलेल्या मुंबई, कल्याण, अमरावती आदी सहा ठिकाणी मोदींच्या सभा झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
देशात नरेंद्र मोदींनी ४०० जाहीर सभा घेतल्या. त्यापैकी केवळ अयोध्येतील सभेत व्यासपीठावर श्रीरामाचे चित्र लावण्यात आले होते. अयोध्येतील सभेत रामाचे चित्र लावायचे नाही का, असा सवाल उपस्थित करीत, या मुद्यावर काँग्रेसनेच जातीय वळण देत प्रचाराची पातळी सोडली, असा प्रत्यारोप मुंडे यांनी केला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील, पक्षाचे शहराध्यक्ष, आमदार विजय देशमुख, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी उपस्थित होते.

Story img Loader