* अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत टीका
* अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राज्यात लोकायुक्त कायदा लागू केला नाही आणि काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी हेही भ्रष्ट आहेत. हे दोघेही पंतप्रधानपदासाठी लायक उमेदवार नसल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी केली.
हजारे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्घी येथे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी हजारे बोलत होते. किरण बेदी, अभय बंग, डॉ. नीलिमा मिश्रा, संतोष भारतीय यांच्यासह राज्यातील कार्यकर्ते या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी आपण देशभर मोहीम राबवीत असून, कार्यकर्त्यांनी राज्यातील गावागावांत ही मोहीम राबवावी.
हजारे म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चारित्र्यवान उमेदवारांना मतदान करण्याची शपथ कार्यकर्त्यांनी मतदारांना द्यावी. लोकसभेमध्ये १६३ खासदार कलंकित आहेत. राज्यघटनेत पक्ष स्थापन करण्याविषयीची मान्यता नाही किंवा तसा उल्लेखही नाही, त्यामुळे पक्ष बेकायदेशीर आहेत. या राजकीय पक्षांनीच लोकशाहीवर अतिक्रमण केले असून, जनतेने यापुढील काळात या राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.’’ स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढय़ासाठी सर्वानी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले.
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्याची सूचनाही अण्णांनी केली. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे वृक्षारोपण करण्यात आले. सर्वरोग निदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. पारनेर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अण्णा हजारे युवा मंच, रियल पॉवर ग्रुप, नागेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले, तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा