Narendra Modi on Rahul Gandhi & Bal Thackeray : “राहुल गांधी कधी बाळासाहेब ठाकरे यांचं कौतुक करत नाहीत, त्यामुळे राहुल गांधींना बाळासाहेबांचं कौतुक करायला लावून दाखवावं”, असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना दिलं आहे. तसेच ते म्हणाले, देश व महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान अतुलनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नांदेडमधील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं कौतुक केलं. तसेच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, या भारताच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान अतुलनीय आहे. परंतु, काँग्रेस नेत्यांच्या तोंडून त्यांच्याबद्दल कधी चांगले शब्द ऐकायला मिळत नाहीत. काँग्रेस नेते कधी बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा करताना दिसत नाहीत. त्यामुळे मी महाविकास आघाडीमधील नेत्यांना आणि काँग्रेसच्या दोस्तांना (उद्धव ठाकरे व शरद पवार) आव्हान देतो की त्यांनी काँग्रेसच्या युवराजांना (राहुल गांधी) बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं कौतुक करायला लावावं. त्यांनी सार्वजनिकरित्या बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या विचारांची प्रशंसा करावी. मी आजपासून दिवस मोजण्यास सुरुवात करत आहे. मी महाविकास आघाडीकडून उचित उत्तराची अपेक्षा व्यक्त करतो.
अमित शाहांचं उद्धव ठाकरे यांना आव्हान
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. आरोप-प्रत्यारोप अन् टीका-टिप्पण्यांना उत आला आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर असून भाजपाचा आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी रावेर विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. अमित शाह म्हणाले, काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे तिन्ही पक्ष एकत्र मिळून ही निवडणूक लढवत आहेत. हे राहुल बाबा आमच्या सावरकरांना विरोध करत आहेत. उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दोन चांगले शब्द बोलायला सांगा.”
© IE Online Media Services (P) Ltd