वाई : सरकारची चुकीची धोरणे, वाढती महागाई आणि सत्तेचा आलेला उन्माद यातून सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल करणाऱ्या मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे मत शरद पवार यांनी वाई येथील सभेत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने, भारत पाटणकर, वर्षा देशपांडे, अश्विनी महांगडे, संदीप देसाई आदी उपस्थित होते.

हेही वाचा…काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली – मुख्यमंत्री शिंदे

पवार म्हणाले, देशाचं राजकारण उध्वस्त करण्याचं काम त्यांनी केले. लोकशाही मजबूत करण्याचे कोणतेही धोरण सरकारकडे नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यांना बरोबर घेऊन देशात दबावाच राजकारण सुरू आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना थेट तुरुंगात डांबले जात आहे. मोदीजी धोरणे ही महागाई कमी करण्याची नाही तर वाढवण्याची आहेत. त्यांची पक्ष फोडण्याची भूमिका लोकांना पटलेली नाही. हा देश एक संघ ठेवायचा असेल लोकशाही मजबूत करायची असेल तर राजकीय पक्ष व्यवस्थित चालतील याची काळजी घेतली पाहिजे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना समाजाचे भविष्य कळत नाही.

पक्ष फोडण्याचे काम देशाचे पंतप्रधान करत आहेत. त्यांच्या या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्र यावेळी वेगळ्या रस्त्याने जाणार आहे. चुकीचे राजकारण करण्याच्या संदर्भात ज्यांनी पावले टाकली त्यांच्या हातामध्ये लोक पाठिंबा देणार नाही. लोकांच्या मनामध्ये नसलेल्या गोष्टी आणून त्या देशाचा कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.मागील दहा वर्षात मोदींनी खूप काम केल्याने ते महाराष्ट्रात गरागरा फिरत आहेत. जर त्यांनी दहा वर्षात खूप काम केलं आहे व त्यांना आपले काम सांगण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याची गरजच का भासते आहे.

हेही वाचा…सांगली : तपमान ४१ वर, प्रचारासह दैनंदिन कामावर परिणाम

देशाची लोकशाही वाचविण्यासाठी, नरेंद्र मोदी आणि अमित शहांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी, देशाचे संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना घरी बसविण्यासाठी, महागाई वाढवून गोरगरिबांचे कंबरडे मोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सत्ता बदल करावा.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातून शशिकांत शिंदे हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकतील असा दावा करताना, खासदार शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची अवघ्या महाराष्ट्राची परंपरा आहे. पण, काहींना त्यांची आठवण निवडणुकीतच होते असा टोला शरद पवार यांनी उदयनराजेंना लगावला. यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची त्यांची आठवण ही आनंदाची बाब असाल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा…मविआच्या एकसंघपणामुळे विजय निश्चित – चंद्रहार पाटील

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील पक्ष फोडले आणि सरकारी पाडली मोदींचा राजाश्रय असल्याशिवाय असे घडलेलेच नाही. सध्या केवळ पक्ष फोडणे, खोकी, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा दबाव व आमिष दाखवण्यापलीकडे काहीच घडत नाही. सत्ताधाऱ्यांनी भलेही आमदार, नेते फोडले असलेतरी सर्वसामान्य मतदार मात्र या सर्वांची चीड बाळगून आहेत. आता राज्यघटना बदलण्याची हिंमत करणाऱ्या व लोकशाहीसाठी घातक असलेल्या विघातक वृत्तींविरुद्ध ही निवडणूक होत असल्यामुळे तुम्ही आम्ही बेसावध न राहता अत्यंत जबाबदारीने चांगल्या खासदारांना विजयी करण्यासाठी सर्वस्व समर्पित करणे गरजेचे असल्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. २०१४ च्या पूर्वीच्या सरकारांनी मधील तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि कृषिमंत्री शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच देशात आज अनेक क्षेत्रात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…‘सगेसोयरे’ ज्यांना मान्य, त्यांच्या पाठीशी मराठा समाज; धाराशिव दौर्‍यात मनोज जरांगे-पाटील यांचे मत

यावेळी भारत पाटणकर खासदार श्रीनिवास पाटील आमदार बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे अश्विनी महांगडे आदींची भाषणे झाली सभेला मोठ्या संख्येने समाज उपस्थित होता

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi who makes life difficult for common people has no right to remain in power said sharad pawar psg
Show comments