२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत ही गोष्ट निश्चित आहे. सरकार कुणाचं येईल हे आज सांगता येणार नाही. मात्र नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत. कारण नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं असेल तर भाजपाला २७२ जागा जिंकाव्या लागतील. मात्र सद्यस्थितीत भाजपाला २०० जागाही मिळतील का? अशी स्थिती आहे असं वक्तव्य करत मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आजच्या दिवशी म्हणजेच १३ ऑक्टोबर १९३५ या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली. याच धर्मांतर घोषणेचा ८८ व्या वर्धापन दिनाला प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दोन दिवसांपूर्वीही मोदींवर टीका

देशात सलग तिसऱ्यांदा भाजपाची सत्ता येईल आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनतील, असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी केवळ दोन वर्षे पंतप्रधान म्हणून काम करतील, त्यानंतर ते हिमालयात निघून जातील, असंही बोललं जात आहे.

याच मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह राष्ट्रीय स्वंयसेवक संघ अर्थात आरएसएसवर जोरदार टोलेबाजी केली आहे. नरेंद्र मोदींना दोन वर्षांनी हिमालयात कशाला पाठवताय, त्यांना आत्ताच हिमालयात पाठवा. देशाचं खूप भलं होईल, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

“नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा सत्ता येणार आणि ते फक्त दोन वर्षे पंतप्रधान राहणार, त्यानंतर ते साधू बनून हिमालयात निघून जातील, असा प्रचार सुरू आहे. माझं आरएसएसवाल्यांना आवाहन आहे, तुम्ही दोन वर्षांनी कशाला पाठवताय, तुम्ही आताच मोदींना हिमालयात पाठवून द्या. या देशाचं फार मोठं भलं होईल.” हे वक्तव्य त्यांनी बीडमध्ये केलं होतं. आता त्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत असा दावा केला आहे.