मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी ( ३१ ऑक्टोबर ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. उपमुख्यमंत्री जाणुनबुजून इंटरनेट बंद करत आहेत. त्यामुळे लोकांचा रोष वाढत आहे. या सगळ्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा आमच्याशी दगाफटका करण्याचा डाव असू शकतो. हा गंभीर आरोप वाटत असेल, पण मी हे थेट सांगत आहे. आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भीत नाही, असे म्हणत जरांगे-पाटलांनी फडणवीसांवर टीका केली होती.
यावरून भाजपा नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी जरांगे-पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे. “फडणवीसांबद्दल जरांगे-पाटलांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. तुमच्या आंदोलनापर्यंत मर्यादित राहावं,” अशा शब्दांत नरेंद्र पाटलांनी जरांगे-पाटलांना खडसावलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा : मराठा आरक्षणाप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारनं…”
“जरांगे-पाटलांना कशाची भीती आहे, माहिती नाही. जरांगे-पाटील सतत फडणवीसांवर व्यक्तिगत टीका करत आहेत. हे फार चुकीचं आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाली किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, याचा जरांगे-पाटलांना राग आहे का? जरांगे-पाटलांचा बोलवता धनी कोण?” असा सवालही नरेंद्र पाटलांनी उपस्थित केला.
“बीडमधील जाळपोळीनंतर जरांगे-पाटलांनी गृहमंत्र्यांबद्दल चुकीचे शब्द काढले. फडणवीस आणि भाजपाबाबत जरांगे-पाटलांनी केलेलं विधान चुकीचं आहे. जरांगे-पाटलांनी आंदोलनापर्यंतच मर्यादित राहावं,” असं नरेंद्र पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा : “…म्हणून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा”, सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
जरांगे-पाटील काय म्हणाले होते?
“बीडमध्ये साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांना मारहाण करुन आणि अन्य आंदोलकांवर ३०७ चा गुन्हा दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना निवांत झोप आली असेल. उपमुख्यमंत्री जाणुनबुजून इंटरनेट बंद करत आहेत. त्यामुळे लोकांचा रोष वाढत आहे. या सगळ्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा आमच्याशी दगाफटका करण्याचा डाव असू शकतो, असे लोकांना वाटत आहे. हा गंभीर आरोप वाटत असेल, पण मी हे थेट सांगत आहे. आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भीत नाही. तुमचं करिअर बरबाद करायचं की चांगलं, हे मराठ्यांच्या हातात आहे,” असा इशारा जरांगे-पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता.