शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी ( २६ फेब्रुवारी ) शिंदे सरकारवर हल्ला चढवला होता. हे सरकार ईडी सरकार नसून बिसी ( बिल्डर आणि कॉन्ट्रक्टर ) सरकार झालं आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे. आदित्य ठाकरेंच्या टीकेला आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबई महापालिकेचा प्रत्येक दगड ‘मातोश्री’ला विचारतोय पैसा कुठं गेला, असं नरेश मस्केंनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नरेश मस्के म्हणाले की, “‘मातोश्री’ आणि खोके हे वेगळं आहे का? तुम्ही काचेच्या घरात राहता, दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचे प्रयत्न करु नका, उद्ध्वस्त व्हाल. मुंबई, महाराष्ट्रात तुम्हाला तोंड दाखवून फिरता येणार नाही. गेले चार-पाच वर्षे तुमचं ब्रँडिंग करण्यासाठी मित्रांच्या कंपन्यांनी कोटी रुपये खर्च केलं.”
“कार्यक्रमांसाठी लागणार खर्च कुठून आणि कशातून केला. कोणत्या अकाउंटमधून तो खर्च दाखवत आहे. परदेश दौरे आणि तुमचे रात्रीच्या उद्योगांबद्दल बोलणार नाही. आम्ही बोललं तर आदित्य ठाकरे तुमची पळताभुई होईल,” असा इशारा नरेश मस्केंनी दिला आहे.
“कोणत्या कंपन्या आणि उद्योग आहेत तुमचे. मुंबई महापालिकेतील प्रत्येक दगड मातोश्रीला विचारत आहे, गोरगरिब नागरिकांच्या करातून मिळालेला पैसा कुठं गेला. ‘मातोश्री’वरील चंदू आणि नंदू हे कोण आहेत, आम्हाला सांगायला लावू नका. काळ्याचं पांढरं करण्यासाठी कुठल्या देशी-परदेशी कंपन्या आहेत, याची आम्हाला सर्व लोकं माहिती देत आहेत,” असेही नरेश मस्केंनी सांगितलं.