ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर भाष्य केलं. तसेच त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना सोडून गेलेल्या लोकांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यासारखी झाली आहे, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली.
राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांचीच अवस्था उकिरड्याप्रमाणे झाली आहे. येत्या काळात महाविकास आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडायला सुरुवात करतील, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
“शिवसेना सोडून गेलेल्या लोकांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यासारखी झाली आहे” या संजय राऊतांच्या टीकेबाबत विचारलं असता नरेश म्हस्के म्हणाले, “मुळात संजय राऊत यांची स्वत:ची अवस्था उकिरड्याप्रमाणे झाली आहे. मध्यंतरी अजित पवारही म्हणाले होते की, कोण संजय राऊत? त्यानंतर नाना पटोलेंनीही “आमच्यामध्ये चोंबडेगिरी करू नये” असा इशारा दिला होता.”
हेही वाचा- “मी नाव घेत नाही, अन्यथा मला…”, बाजार समितीच्या निवडणुकीबाबत अजित पवारांचं विधान
“त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस संजय राऊतांना हाकलून देतेय. त्यांचा स्वत:चा उकिरडा झाला आहे. त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची अवस्थाही उकिरड्यासारखी केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी निघाले होते. पण आता काही दिवसांत राष्ट्रवादीवालेही संजय राऊतांना हाकलून देतील. त्यांची महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी आहे, येत्या काही दिवसांत ते एकमेकांचे कपडे फाडायला सुरुवात करतील,” असंही नरेश म्हस्के म्हणाले.