राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युवक काँग्रेसच्या ‘युवा मंथन’ कार्यक्रमात पक्षातील नेतृत्वबदलाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भाकरी फिरवावी लागते ती फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असं विधान शरद पवारांनी केलं आहे.
शरद पवारांच्या या विधानावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचा बोलण्याचा रोख अजित पवारांकडे होता. अजित पवारांना बाजुला करण्यासाठी राष्ट्रवादीत खटाटोप सुरू आहे, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- “अजित पवार मुख्यमंत्री होणारच…”, थेट अमित शाहांचं नाव घेत राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
शरद पवारांच्या विधानावर भाष्य करताना नरेश म्हस्के म्हणाले, “आपण काल शरद पवारांचं वक्तव्य ऐकलं. शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा अर्थ सरळ-सरळ आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. पक्षसंघटनेत नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. भाकरी फिरवली पाहिजे, याचा अर्थ अजित पवारांना दूर केलं पाहिजे, असा सरळ अर्थ होतो. हवं तर तुम्ही सकाळचा भोंगा वाजतो, त्यांना विचारा…”
हेही वाचा- “भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, विलंब करुन चालणार नाही..” शरद पवारांकडून बदलांचे संकेत
“भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ काय होतो? तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही त्याची माहिती घ्या. गेल्या आठवड्यात पवार कुटुंबामध्ये कुणाला तरी खासदारकीची उमेदवारी देण्यावरून अंतर्गत गृहकलह झाला, त्यानंतर सगळं रामायण घडलं. परवा शरद पवार म्हणाले संजय राऊत पत्रकार आहेत, त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात. तुम्हीही पत्रकार आहात, तुम्हीही माहिती काढा. मागील आठवड्यात राष्ट्रवादीमध्ये जे काही रामायण घडलं आहे, ते कशामुळे घडलं? याची माहिती काढा. आपल्याला माहिती मिळाली नाही, तर उद्या सकाळी भोंग्याला विचारा… कारण त्यांची शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जास्त निष्ठा आहे. अजित पवार यांना बाजुला करण्यासाठी राष्ट्रवादीत खटाटोप सुरू आहे. भाकरी फिरवली पाहिजे. नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, हा रोष आणि रोख अजित पवार यांच्याकडेच आहे,” अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली.