शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडून येऊन दाखवा. तुम्ही कितीही खोके वाटले तरी इथला एकही शिवसैनिक विकला जाणार नाही, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं. आदित्य ठाकरे यांच्या आव्हानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील ‘जेलर’सारखी झाली आहे. त्यांना परळीतून निवडून आणण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले, किती सेटलमेंट कराव्या लागल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, अशा शब्दांत नरेश म्हस्के यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “…तर त्यांची सुंता झाली असती”, अजित पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली!
आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या आव्हानावर भाष्य करताना नरेश म्हस्के म्हणाले, “मी लायकी म्हणणार नाही, पण योग्यता आणि पात्रता नसलेल्या तरीही कॅबिनेट मंत्री झालेल्या व्यक्तीने आपली उंची आणि वय याचं भान ठेवलं पाहिजे. त्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला शिवसेनेच्या कामात वाहून घेतलं आहे. त्यांच्यामागे शिवसनेनेला पाठिंबा देणारे ४० आणि सरकारला पाठिंबा देणारे १० आमदार आहेत. शिवाय १३ खासदार आणि लाखो शिवसैनिक आणि नगरसेवक त्यांच्या पाठिशी आहेत.”
नरेश म्हस्के पुढे म्हणाले, “आदित्य ठाकरेंना वरळीतून निवडून आणण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले आहेत किंवा किती सेटलमेंट कराव्या लागल्या आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तेथील पदाधिकारी नाराज होऊ नये, म्हणून त्यांना मतदारसंघात महापौर करावं लागलं. तुम्ही वरळी मतदारसंघच का निवडला? आपण जिथे राहता तेथून निवडणुकीसाठी उभे का राहिला नाहीत? कारण तुम्ही पडले असता.”
“त्यामुळे मला म्हणायचंय की, आपण केवळ वरळीपुरतेच उरले आहात. त्यामुळे आव्हानाची भाषा करू नका. वरळीतील नगरसेवकही तुमची साथ सोडून एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आपली जी परिस्थिती झाली ती आम्ही समजू शकतो. पण वरळीतून तुमच्याविरोधात लढायला एकनाथ शिंदे कशाला पाहिजेत,आम्ही एखादा सर्वसामान्य शिवसैनिकही तुमच्याविरोधात उभा करून त्याला निवडून आणू. शोले चित्रपटातील जेलर माहीत असेल ना? तशी परिस्थिती आदित्य ठाकरेंची झाली आहे. कारण त्यांच्यामागे कुणी नाहीये. तो जेलर ज्यापद्धतीने बरळत असतो. त्याच पद्धतीने आदित्य ठाकरे बरळत आहेत. त्यांच्या बालिश आव्हानाकडे आम्ही दुर्लक्ष करतो,” अशी बोचरी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.