सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कोर्टात गेला आहे. राहुल नार्वेकरांनी राजकीय पक्ष कोणता आणि त्यानुसार वैध व्हीपनं जारी केलेल्या आदेशांचं उल्लंघन करणारे कोणते आमदार अपात्र होणार? यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही गटांकडून पक्षाची घटना नार्वेकरांनी मागवली असल्याचं सांगितलं जात आहे. सविस्तर तपास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं नार्वेकर पहिल्या दिवसापासून सांगत आहेत. मात्र, आता त्यांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी टोला लगावला आहे.
राहुल नार्वेकर हे भाजपा आमदार असून ते पक्षांतर करून भाजपात आले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकरांना पक्षांतराचं वावडं नसेल, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांकडून न्याय्य निकाल येणार नसल्याचा दावा विरोधक करत आहेत. दुसरीकडे नार्वेकरांनी मात्र सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीत योग्य त्या प्रक्रियांचा अवलंब करूनच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याबाबत नेमका निकाल काय लागणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आता नरहरी झिरवळांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.
काय म्हणाले नरहरी झिरवळ?
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राहुल नार्वेकरांना टोला लगावला आहे. “तपासण्यापलीकडे त्यांच्याकडे मार्ग नाहीये. पण कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १० ते १२ त्रुटी सांगितल्या आहेत. त्या सगळ्याच विरोधात आहेत. फक्त एकच बाब आहे की ती तपासायला राहुल नार्वेकरांकडे दिली आहे. तपास हा तपासच असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही”, असं झिरवळ म्हणाले आहेत.
कधी लागणार निकाल?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना फक्त योग्य वेळेत किंवा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, एवढंच सांगितलं आहे. त्यामुळे नेमकी कालमर्यादा नसलेला हा निकाल नेमका कधी येणार? याविषयी कोणतीही स्पष्टता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नाही. त्यासंदर्भात बोलताना झिरवळ यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
“लवकरात लवकर’ ही एक राजकीय व्यासपीठावरची किंवा सभागृहातली भाषा आहे. लवकरात लवकर याला कधीही लवकर म्हणता येतं. परवाही लवकर आणि सहा महिन्यांनीही लवकरच असतं”, असं झिरवळ म्हणाले.