शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत दिली आहे. अवघ्या दोन दिवसांनी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय समोर येणार आहे. जसजशी ही तारीख जवळ येऊ लागली आहे तसतशी शिवसेनेच्या आमदारांची धाकधुक वाढू लागली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. बुधवारपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडून उचित निकाल अपेक्षित आहे. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून, यापुढे नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयातून मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे या आठवड्यात शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या भवितव्याचा निकाल लागेल.
एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. परंतु, सध्या तरी शिंदे गटातील नेते निश्चिंत आहेत. परंतु, शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर नेतृत्व बदल किंवा अन्य काही हालचाली पाहायला मिळू शकतात. दरम्यान, एकनाथ शिंदे अपात्र ठरलेच तर त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करून त्यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवलं जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.
आमदार अपात्रतेवरील निकाल येण्यापूर्वीच यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि आत्ता (महायुती सरकार) विधानसभेचे उपसभापती असणाऱ्या नरहरी झिरवळ यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी काही वेळापूर्वी आमदार अपात्रता प्रकरणावर प्रश्न विचारला. यावर नरहरी झिरवळ म्हणाले, आमदार अपात्रतेशी माझा काय संबंध? आधी मी ठाम होतो, पण तेव्हा मी तिथे (मविआ सरकारमध्ये) होतो. परंतु, आता मी तिथे नाही, त्यामुळे आता मी यावर बोलणार नाही.
आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील आमदार अपात्रतेवर भाष्य केलं आहे. पाटील पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले, आता युद्धाची तयारी सुरू झाली आहे. या तयारीदरम्यान वेगवेगळ्या वावड्या उठू लागल्या आहेत. कोणी काहीही सांगतं. काहीजण विचारत आहेत तुमचं (शिंदे गट) १० जानेवारीला काय होणार? माझं त्यांना एकच उत्तर आहे. ते आमचं आम्ही बघू. आम्हाला श्रद्धांजली अर्पण होणार की, आम्ही शहीद होणार ते आम्ही बघू. तुम्ही त्याची काळजी करू नका.