महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत नाशिक जिल्ह्यातील गावांच्या निरुत्साहाचा परिणाम परिक्षेत्रातील गावांच्या सहभागावर झाला आहे. नाशिक परिक्षेत्रात गेल्या वर्षी ४,५६२ गावांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला होता. परंतु, या वर्षी हीच संख्या ४,४५७ गावांवर आली आहे. सलग दोन वर्षांपासून सहभागित्वाचे प्रमाण घसरत असल्याचे दिसून येते.
गावविकासात अडसर ठरलेले तंटे मिटवून विकासाचा मार्ग सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेचे यंदा सहावे वर्ष आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यास वेगळे परिमाण प्राप्त करून दिले जात आहे. नाशिक परिक्षेत्रात या मोहिमेला ग्रामपंचायतींकडून प्रारंभापासून चांगला प्रतिसाद मिळाला होता. स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर झाली. परंतु, गेल्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या अन् या मोहिमेकडे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी दुर्लक्ष केले. नाशिकमध्ये प्रामुख्याने हे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडले. त्याचा एकंदर परिणाम परिक्षेत्रातील सहभागाचे प्रमाण कमी होण्यात झाला असताना सलग दुसऱ्या वर्षी त्याची पुनरावृत्ती झाल्याचे दिसत आहे. २०१०-११ या वर्षांत नाशिक परिक्षेत्रात एकूण ४८४१ गावांनी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभाग नोंदविला होता, तेव्हा नाशिक जिल्हा आघाडीवर होता. या जिल्ह्यातील १३४७ गावांनी मोहिमेत सहभाग घेतला. त्या खालोखाल अहमदनगर १२९४, जळगाव ११४८, धुळे ७५१, नंदुरबार ५०१ असे प्रमाण होते. २०११-१२ या वर्षांत सहभागी होणाऱ्या एकूण गावांचे प्रमाण २७९ ने कमी होऊन ४,५६२ वर आले होते. त्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील गावांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होऊन १०७५ वर आल्याचे लक्षात येते. अहमदनगर जिल्ह्यातील १२९० गावे, धुळे ५५१, जळगाव ११४५, नंदुरबार ५०१ गावे या मोहिमेत सहभागी झाली आहेत. परिक्षेत्रातील नाशिकवगळता उर्वरित जिल्ह्यांनी आपले सहभागित्वाचे प्रमाण कायम राखण्यात यश प्राप्त केल्याचे दिसून येते. २०१२-१३ वर्षांत हे प्रमाण आणखी खाली म्हणजे ४,४५७ वर घसरले आहे. परिक्षेत्रात मोहिमेत नाशिक जिल्ह्यातील ९३९, अहमदनगर १३१५, धुळे ५५१, जळगाव ११५१ व नंदुरबार जिल्ह्यातील ५०१ गावे सहभागी झाली आहेत.
शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत ‘राजकारण’ कसे आडवे येते, त्याचे हे उदाहरण म्हणता येईल. ग्रामपंचायत निवडणुकीत रमलेल्या गावातील प्रतिष्ठितांनी तंटामुक्त गाव मोहिमेची प्रक्रिया राबविण्यास अनास्था दाखविली. विभागातील बहुतांश ग्रामपंचायती उत्स्फूर्तपणे सहभागी होत असताना उपरोक्त गावांनी निरुत्साह दाखविला. गावात तंटे निर्माण होऊ नये आणि अस्तित्वातील तंटे सामोपचाराच्या माध्यमातून मिटविणे असे या योजनेचे स्वरूप आहे. जी गावे या मोहिमेंतर्गत तंटामुक्त ठरतात, त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पुरस्काराच्या स्वरूपात निधी दिला जातो. सहभागी न झालेल्या गावांनी विकासासाठी निधी प्राप्त करण्याची संधी पुन्हा एकदा गमावली आहे.

Story img Loader