कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची अखेर अवघ्या नऊ महिन्यांमध्ये नाशिकच्या आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली. दरम्यान, नाशिकमधूनच मुंढेंच्या बदलीला विरोध होत आहे. अनेक नागरीकांनी आज मुंढेंच्या बदलीला विरोध करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

आज सकाळी मुंढेंच्या समर्थनासाठी जमलेल्या नागरीकांनी नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वाराचा परिसर ‘वुई वॉन्ट मुंढे’ अशा घोषणांनी दणाणून सोडला. काल(बुधवारी) सुट्टी असतानाही मुंढेंची बदली कशी करण्यात आली असा सवाल नागरीकांनी विचारला. तर भाजपाचं सरकार मुजोर सरकार आहे, अशा शब्दांमध्ये नागरीकांनी भाजपाविरोधात रोष व्यक्त केला. यामध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. मुंढेंच्या बदलीला विरोध करणाऱ्या आपच्या काही कार्यकर्त्यांना आणि नागरीकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. तर, दुसरीकडे मुंढेंची बदली झाल्याचं समजताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आज सकाळी महापौर निवासस्थानी रामायण बंगला येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

हे आंदोलन सुरू असतानाच आयुक्त मुंढे नेहमीप्रमाणे पालिकेत हजर झाले. आंदोलकांच्या गर्दीतून वाट काढत ते आपल्या दालनात गेले. त्यानंतर उपस्थित पत्रकारही त्यांच्यामागे दालनात गेले. माझ्याकडे अद्याप बदलीसंदर्भातील कुठलेही पत्र मिळालेले नाही , त्यामुळे मी नियमीत कामकाजाला सुरुवात केल्याचे सांगत मुंढे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. मात्र, अखेर मुंढेंना बदलीसंदर्भातील पत्र देण्यात आले. त्यानुसार मंत्रालयातील नियोजन विभागात सह सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


का झाली बदली?

गेल्या नऊ महिन्यांपासून मुंढेंच्या बदलीसाठी प्रयत्न आणि चर्चा होत होत्या. फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या आयुक्‍तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच आयुक्‍त मुंढे हे वादात आणि चर्चेत राहिले आहेत. नगरसेवकांचा निधी रद्द करणे, महासभेत प्रस्ताव न आणता परस्पर निविदा प्रक्रिया राबविणे, आमदारांच्या निधीतील कामांना डावलणे, करयोग्य मूल्य दर लागू करणे, अंगणवाड्या बंद करणे, कंत्राटी कामगार कमी करणे, महासभेचा निर्णय होऊनही त्यास न जुमानणे, महापौर आणि पदाधिकार्‍यांच्या अधिकारांवर गदा आणणे यासह अनेक बाबींमुळे आयुक्‍त मुंढे यांच्या विरोधात संपूर्ण नगरसेवक आणि पदाधिकारी एकवटले होते. याशिवाय सिडकोतील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठीदेखील आयुक्‍तांनी मोहीम हाती घेतल्याने सिडकोतील नागरिकांनी शासनाविरुद्ध असंतोष व्यक्‍त केला होता.

Story img Loader