महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणच्या (म्हाडा) नाशिक विभागाला आठ महिन्यांपासून स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नाही. पालकमंत्र्यांनी अलीकडेच नरेंद्र दराडे या आपल्या समर्थकास विभागाच्या अध्यक्षपदी बसवून ज्याप्रमाणे आपली राजकीय सोय बघितली, त्याप्रमाणे आता स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी मिळावा म्हणून प्रयत्न करण्याची अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.
येवला हा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ. या मतदारसंघावरील आपली पकड मजबूत करताना पालकमंत्र्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकातील मुख्य कर्त्यांस आपल्या कळपात आणण्याची खेळी खेळली. दराडे हे त्यापैकीच एक. भुजबळांसारख्या वजनदार नेत्यास आपण निवडणुकीत सहकार्य केले तर भविष्यात त्याचे नक्कीच फळ मिळेल, या आशेने येवल्यात अनेकांनी ‘एकमेका साहाय्य करू..’ची भूमिका घेतली. त्यापैकी मोजक्या जणांना फळ मिळण्यास फार काळ वाट पाहावी लागली नाही, परंतु अनेक जण अजूनही वाटच पाहात आहेत. दराडेंसारख्या खंद्या समर्थकाने सर्वशक्तिनिशी साथ देऊनही त्यांना अधिक काळ तिष्ठत राहावे लागले. मध्यंतरी त्यामुळे ते भुजबळांपासून दूर जातात की काय, अशीही चर्चा रंगली होती. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अशी नाराजी परवडणारी नसल्याने भुजबळांनी ‘म्हाडा’च्या नाशिक विभाग अध्यक्षपदी अलीकडेच त्यांची वर्णी लावली. दराडेंच्या वर्णीमुळे पालकमंत्र्यांची राजकीय सोय झाली, परंतु महत्त्वपूर्ण अशा मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आठ महिन्यांपासून स्वतंत्र व्यक्ती नाही, याकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष झाल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. ऑक्टोबर २०१२ पासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार औरंगाबाद विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षां ठाकूर सांभाळत आहेत.
म्हाडाच्या इतर सर्वच विभागांसाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जळगाव, नगर, नंदुरबार, धुळे आणि नाशिक या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या विभागात इतक्या दिवसांपासून या पदासाठी स्वतंत्र व्यक्ती नाही.

Story img Loader