साधुग्रामसह विविध मुद्दय़ांवरून महापालिकेत नुकत्याच झालेल्या बैठकीत जो गदारोळ उडाला, त्याची पुनरावृत्ती जिल्हाधिकारी कार्यालयात होऊ नये याची खबरदारी घेत प्रशासनाने गुरुवारी याच विषयावर बोलाविलेली बैठक ही प्राथमिक असल्याचे सांगून सावधगिरीने पाऊल टाकले. या वेळी साधु-महंतांनी गोदातीर्थाचे पावित्र्य राखण्याबरोबर गोदाकाठावरील अतिक्रमण काढणे, परिसरात मांस विक्रीला प्रतिबंध घालणे, भाजीबाजार हटविणे अशा सूचना केल्या असल्या तरी साधुग्रामसाठी जागा आरक्षित करण्याचा मुख्य मुद्दा मांडलाच गेला नाही. कोणत्याही विषयावरून फारशी वादावादी न होता बैठक आटोपली गेल्यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, साधु-महंतांशी चर्चा करून त्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मागील आठवडय़ात याच स्वरूपाची बैठक महापालिकेत पार पडली होती. तेव्हा साधग्रामसाठी संपादित करावयाच्या जागेवरून साधु-महंतांनी चांगलेच खडे बोल सुनावले होते. सिंहस्थात साधुग्रामममध्ये तीन आखाडे व सहाशेहून अधिक खालसे येत असतात. गतवेळी त्यांच्यासाठी जागा अपुरी पडली असताना या प्रश्नात महापालिकेने घोळ घातल्याचे सांगितले जाते. यावरून पालिकेच्या बैठकीत बराच गदारोळ उडाल्यामुळे जिल्हा प्रशासनासमवेतच्या बैठकीचा श्रीगणेशा वादंगाने होऊ नये, याची चांगलीच दक्षता घेण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. जिल्हाधिकारी विलास पाटील, कुंभमेळा अधिकारी रघुनाथ गावंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, महंत कृष्णचरणदास, स्वामी सच्चिदानंद सरस्वती, महंत भक्त चरणदास, दत्तात्रय भानोसे, अनिल दीक्षित आदी उपस्थित होते.
प्रारंभीच कुंभमेळा अधिकाऱ्यांनी ही बैठक प्राथमिक स्वरूपाची असून एप्रिलमध्ये पुन्हा संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगून टाकले. सध्या अंतिम आराखडा बनविण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. साधु-महंतांनी काही सूचना केल्यास त्यांचा अंतर्भाव त्यात करता येईल. यामुळे बैठकीत सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले. सुरुवातीला ही बाब स्पष्ट केल्यामुळे उपस्थितांनी वेगवेगळ्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. गोदाघाट परिसरात भाजीबाजारामुळे अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच भागात खुलेआम मांसविक्री केली जाते. परिणामी, गोदावरी प्रदूषणाच्या गर्दीत सापडली आहे. न्यायालयाने निर्देश देऊनही प्रदूषणाची ही समस्या दूर होऊ शकली नाही. गोदातीर्थाचे पावित्र्य कायम राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा साधु-महंतांनी व्यक्त केली. गोदाघाटचा परिसर मोकळा करण्यासाठी प्रथम अतिक्रमणे हटविणे आवश्यक आहे. शाही मार्गाचे विस्तारीकरण व इतर काही प्रश्नांवर सूचना करण्यात आल्या. वेगवेगळे मुद्दे या वेळी मांडले गेले असले तरी साधुग्रामसाठी आरक्षित करावयाच्या जागेची जबाबदारी नेमकी कोणाची, हा विषय चर्चेत आला नाही. पंचवटीतील तपोवन परिसरात यासाठी सुमारे ३०० एकर जागा ताब्यात घेण्याचा आधी प्रस्ताव होता. परंतु आता पालिकेने ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न चालविला आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा कोणी उल्लेख केला नाही. परिणामी, बैठक तर शांततेत पार पडली, पण त्याची फलनिष्पत्ती नेमकी काय होती, हे कोणालाही समजणे अवघड ठरले.

Story img Loader