जिल्ह्यातील ग्राहकांकडे असलेली ४८७ कोटी रुपयांची थकबाकी कशी वसूल करायची, हा प्रश्न महावितरण कंपनीला सध्या सतावत आहे. कृषिपंपांची ४३९.८२ कोटी, घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांची ३७.०८ कोटी तर नगरपालिकांकडील पाणीपुरवठा योजनांचे १०.१४ कोटी रुपये थकीत आहेत.
जिल्ह्यात ग्रामीण व शहर असे दोन मंडळ आहेत. नाशिक ग्रामीण मंडळांतर्गत कळवण, मालेगाव, मनमाड, सटाणा, नाशिक ग्रामीण असे विभाग येतात. तर, नाशिक शहर मंडळांतर्गत नाशिक शहर (१) आणि नाशिक शहर (२) असे विभाग येतात. सद्यस्थितीत सर्वच विभागांत विविध वर्गवारीतील ग्राहकांचे देयक थकलेले आहे.
वारंवार केलेल्या आवाहनास दाद न मिळाल्याने महावितरणने कायदेशीररीत्या वीज जोडणी कापण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक शहर मंडळात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा ७०६५५ ग्राहकांचे ९.२६ कोटी रुपये थकीत आहेत. कृषीपंपधारक १८२०६ ग्राहकांचे १३.१३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
नाशिक ग्रामीण मंडळातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील एक लाख ४८ हजार ग्राहकांकडे २७.८२ कोटी रुपये थकले आहेत. कृषिपंपधारक २,४३,८९६ ग्राहकांकडे ४२६.९६ कोटी रुपये थकले आहेत. नाशिक जिल्ह्यातील १३५६ पाणीपुरवठा योजनांकडे विद्युत देयकांचे १०.१४ कोटी रुपये थकले आहेत.

Story img Loader